विविध मार्गानी दहशतवाद पोसून भारताच्या सातत्याने कुरापती काढणाऱ्या, भारतात घातपात घडवणाऱ्या पाकिस्तानला भारताने अखेर थेट मैदानात उतरून धडा शिकवला. आजवर कायम संयम बाळगणाऱ्या लष्कराच्या विशेष कमांडो दलाने बुधवारी मध्यरात्री नियंत्रण रेषा ओलांडत, पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त केले आणि उरी येथील लष्करी तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या अमानुष हल्ल्याचा हिशेब चुकता केला. सुमारे पाच तासांच्या या लक्ष्यभेदी कारवाईत किमान ४० दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज आहे. भारताच्या या कारवाईने पाकिस्तान पुरता हादरला आहे. यानंतर भारताच्या या निर्णयाबाबत सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, मूळचा पाकिस्तानी असलेला गायक अदनान सामी याने ‘सर्जिकल स्ट्राइक’बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत.
गायक अदनान सामी याने शुभेच्छा देणारे ट्विट केले असून त्यात म्हटलेय की,’ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या देशाच्या सर्व शूर जवानांना दहशतवादाविरुद्ध केलेल्या यशस्वी ‘सर्जिक स्ट्राइक’साठी खूप सा-या शुभेच्छा. सलाम!’ मूळचा लाहोरचा असणारा अदनान सामी १३ मार्च २००१ रोजी पहिल्यांदा पर्यटक व्हिसावर भारतात आला होता.  गेल्यावर्षी मानवतेच्या दृष्टीकोनातून आपल्याला भारतात राहू देण्यात यावे, अशी विनंती करत अदनान सामीने भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. त्यानंतर अदनानचा हा अर्ज मंजूर करत त्याला १ जानेवारीपासून भारताचे नागरिकत्व देण्यात आले. कायद्यानुसार विज्ञान, तत्वज्ञान, कला, साहित्य, जागतिक शांतता या क्षेत्रांमध्ये विशेष योगदान देणाऱ्यांना भारतीय नागरिकत्व देण्याची सोय आहे.