प्रसिद्ध गायिका सुचित्रा कृष्णमूर्तीने काही दिवसांपूर्वी मशिदीमध्ये होणाऱ्या अजानविरोधात एक ट्विट केलं होतं. या ट्विटनंतर सोशल मीडियावर मुस्लिम बांधवांनी निराशा व्यक्त करत सुचित्रावर आगपाखड केली. नेटिझन्सच्या रोषाला सामोरं जातानाच तिला काही अश्लील ट्विट्सचाही सामन करावा लागला. अश्लील आणि आक्षेपार्ह भाषेत ट्विट करत काहीजणांनी सोशल मीडियावर मर्यादा ओलांडल्यामुळे अखेर सुचित्राला पोलिसांची मदत घ्यावी लागली.

पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणी ४ ट्विटर युझर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल. सुचित्राने हे सर्वकाही सर्वाचं लक्ष वेधून घेण्यासाठी केलं आहे, असा आरोपही तिच्यावर काही नेटिझन्सनी केला. तर काहीजणांनी अतिशय खालच्या पातळीला जात तिच्यावर टीका केली. या सर्व ट्विट्सचा एक स्क्रीनशॉट सुचित्राने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट केला. या ट्विटमध्ये तिने सध्याच्या नेटिझन्सचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि त्या अश्लील ट्विट्सविषयी निराशा व्यक्त केली.

आपल्याविषयी अश्लील ट्विट करणाऱ्यांची भाषा आणि त्यांचा विरोध पाहता अखेर तिने ओशिवरा पोलिसांची मदत घेतली. तिच्या तक्रारीनंतर चार आरोपींवर कलम ५०९ आणि कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हा आता या प्रकरणाला पुढे कोणतं वळण मिळणार याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण सोनू निगम अजान ट्विट प्रकरणाप्रमाणेच सुचित्राने केलेल्या ट्विटमुळेही मुस्लिम बांधवांमध्ये अशांततेचं वातावरण असल्याचं लक्षात येतंय.

वाचा : .. म्हणून शाहरुखच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांना एकही पैसा मिळणार नाही

काही दिवसांपूर्वी सुचित्राने अजानविषयी ट्विट केल्यामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला. ‘पहाटे पावणे पाचला घरी आल्यानंतर अजानचा कर्णकर्कश्श आवाज ऐकावा लागला. एखादा धर्म अशा प्रकारे इतरांवर लादणं यापेक्षा दुर्दैवी काहीच असू शकत नाही’, असं ट्विट तिने केलं होतं. या ट्विटनंतर अनेकांनी नाराजी व्यक्त करत आपली मतं मांडण्यास सुरुवात केली. यापैकी एका ट्विटला उत्तर देत सुचित्रा म्हणाली की, ‘आजूबाजूच्या परिसरातील लोकांना पहाटे पाच वाजता उठवणं हे तर असभ्यतेचं लक्षण आहे. मी सकाळी उठल्यावर नेहमी प्रार्थना आणि रियाज करते. असं जाहीरपणे लाऊडस्पीकरचा वापर करुन इतरांनी मला देवाची आठवण करुन देण्याची काहीच गरज नाही.’