अभिनय आणि सामाजिक बांधिलकी यांचा मेळ साधत प्रेक्षकांसमोर आदर्श ठेवणाऱ्या काही अभिनेत्रींच्या यादीत आता सोनाक्षी सिन्हाचेही नाव समाविष्ट झाले आहे. सोनाक्षीने आपल्या चित्रपटाद्वारेच सामाजिक बांधिलकीचा विडा उचलला आहे. सोनाक्षी सिन्हा आगामी ‘अकिरा’ या चित्रपटात अ‍ॅसिड हल्ल्यांविरोधात उभी ठाकलेली दिसणार आहे. देशाच्या अनेक भागांत आजही तरुणींवर होणाऱ्या अ‍ॅसिड हल्ल्यांचे प्रमाण मोठे आहे. ‘अकिरा’ चित्रपटात या हल्ल्यांचा बळी ठरलेल्या तरुणींच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्याचा येणार आहे. या चित्रपटातून दिग्दर्शक ए. आर. मुरुगडोस यांनी स्त्रियांनी स्वसंरक्षणार्थ कसे सक्षम व्हायला हवे, या मुद्दय़ावर भर दिला आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमांच्या निमित्ताने देशभर फिरताना सोनाक्षी स्वत: या विषयाबद्दल संवाद साधणार आहे. प्रेक्षकांना या विषयावर बोलते करणार आहे. यापूर्वी सोनम कपूर आणि दीपिका पदुकोणनेही सामाजिक कार्यासाठी आपले योगदान दिले आहे. सोनमने कुपोषणाविरुद्ध मोहीम हाती घेतली आहे. ‘फाइट हंगर फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांत सोनम कुपोषणाची समस्या सोडवण्यासाठी काम करणार आहे. कुपोषणाची समस्या सोडवण्यासाठी लोकांनी एकत्र येऊन प्रयत्न केले तर ती नक्कीच दूर होईल. आजही कित्येक मुले फक्त सकस आहार आणि स्वच्छ पाण्यासाठी तडफडतात हे दुर्दैवी आहे, असे मत व्यक्त करत म्हणूनच सोनमने या संस्थेच्या माध्यमातून आपण या कार्याशी जोडले गेलो असल्याचे स्पष्ट केले. सोनमपाठोपाठ आता दीपिका पदुकोणनेही ‘इंडियन सायकियाट्रिक असोसिएशन’ची सदिच्छादूत म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. डिप्रेशनबद्दल कुठलाही आडपडदा न बाळगता खुलेपणाने बोलणाऱ्या दीपिकाने आता निरोगी मानसिक स्वास्थ्यासाठी जनजागृती करावी यासाठी तिच्यावर ही नवी जबाबदारी सोपवण्यात आली असून तिनेही आनंदाने हे कार्य स्वीकारले आहे. आपले चित्रपट सांभाळून आपल्या आवडीच्या सामाजिक मुद्दय़ावर काम करण्याचे आव्हानही या अभिनेत्री सहजतेने पेलताना दिसत आहेत.