लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या ८ सप्टेंबर रोजी प्रसारित झालेल्या एपिसोडमुळे वाद निर्माण झाला होता. या एपिसोडमध्ये काही आक्षेपार्ह आणि लोकांच्या भावना दुखावणारी दृश्यं असल्याचा आरोप करत ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी’ने (SGPC) मालिकेवर तात्काळ बंदीची मागणी केली होती. आता या सर्व वादावर मालिकेच्या निर्मात्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी म्हणाले की, ‘आम्ही रोशन सिंग सोढीच्या व्यक्तिरेखेला गुरु गोविंद सिंगजींच्या अनुयायाच्या रुपात दाखवलं होतं. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. कोणत्याही धर्माचा अपमान करणं किंवा कोणाच्याही धार्मिक भावनांना दुखावणं हा आमचा कधीच हेतू नव्हता.’

‘आमच्या मालिकेत वेगवेगळ्या धर्माचे आणि संस्कृतीचे लोक एकत्र राहतात. सर्वजण एकत्र सण साजरे करतात. कोणतीही व्यक्ती शीख गुरुंचं रुप घेऊ शकत नाही, या गोष्टीचा आम्ही आदर करतो. रोशन सिंग सोढी हे पात्र गुरू गोविंद सिंग म्हणून नव्हे तर त्यांचा एक अनुयायी म्हणून दाखवण्यात आले होते. त्यामुळे प्रेक्षकांनी या गोष्टीचा चुकीचा अर्थ काढू नये, अशी विनंती निर्मात्यांनी केली.

VIDEO : ‘ऊंची है बिल्डिंग..’वर दादा नाचतो तेव्हा…

‘एसजीपीसी’चे प्रमुख कृपालसिंग बादुंगर यांनी मालिकेविरोधात एक निवेदनच जारी केलं होतं. या मालिकेत शिखांचे दहावे धर्मगुरु गुरु गोविंद सिंग हे जिवंत असल्याचे दाखवल्यामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत आणि असं करणं शीख समुदायात आखून देण्यात आलेल्या नियमांविरोधात आहे, असं त्यांनी या निवेदनात स्पष्ट केलं होतं.