टेलिव्हिजन विश्वात दरदिवशी काही लहानमोठे खटके उडतच असतात. पण, अभिनेत्री किश्वर मर्चंटच्या बाबतीत मात्र परिस्थिती जास्त चिघळली असल्याचं लक्षात येत आहे. काही दिवसांपूर्वीच वर्कआऊट सेशन्समध्ये किश्वरच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे तिच्या मालिकांच्या चित्रीकरणाच्या वेळापत्रकावरही याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. ‘सावित्री देवी कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल’ या मालिकेत काम करणाऱ्या किश्वरने तिला मालिकेच्या टीमकडून मिळालेल्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली. इतकंच नाही तर तिने मालिका सोडण्याचाही निर्णय घेतला आहे.

मालिकेच्या निर्मात्यांबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ‘इंडियन एक्स्प्रेस’शी संवाद साधताना किश्वर म्हणाली, ‘महिन्यातील जवळपास २५ दिवस मी या मालिकेसाठी देऊ केले होते. त्यातही फक्त दोन दिवसांचं चित्रीकरण होतं. वारंवार त्यांनी मला ताटकळत ठेवलं आणि जेव्हा मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा मात्र ते मालिका न सोडण्यासाठी माझ्यामागे गयावया करु लागले. ही किती वाईट गोष्ट आहे.’
किश्वर नेहमीच तिचा स्पष्टवक्तेपणा आणि ठाम निर्णयांसाठी ओळखली जाते. त्यामुळे या बाबतीतही तिने लढा देण्याचा निर्णय घेतला असल्याचं

तिच्या बोलण्यातून स्पष्ट होत होतं. ‘सावित्री देवी कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल’ या मालिकेच्या निर्मांत्यांविषयीसुद्धा तिचं मत दूषित झालं असून, त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव फारच वाईट असल्याचंही तिने सांगितलं. ‘रश्मी शर्मा प्रॉडक्शनसोबत काम करण्याचा अनुभव खूपच वाईट होता. त्यांना कलाकार आणि त्यांच्या वेळेची काहीच किंमत नाही. त्यांनी माझ्या भूमिकेची काहीच आखणी केली नव्हती आणि ते मला मालिका सोडण्याचीही परवानगी देत नाहीत. मी दुखापतग्रस्त असतानाही चित्रीकरणासाठी गेले होते. पण, आता मी चित्रीकरण करु शकत नाही असं कारण देत त्यांनीच माझी भूमिका ‘रिप्लेस’ केल्याचं सांगितलं. त्यांनी माझ्याऐवजी कोणा दुसऱ्या अभिनेत्रीच्या नावाची निवड करण्याआधीच मी मालिका सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती ही बाब ते स्वीकारतच नाही आहेत’, असंही ती म्हणाली.

https://www.instagram.com/p/BZWinJ6nxsg/

किश्वरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन यासंबंधीचं एक ओपन लेटरही शेअर केलं. यामध्ये तिने कार्यक्रमाच्या निर्मातीला खडे बोल सुनावले. आपल्या भूमिकेसाठी जवळपास चार महिने वाट पाहिल्यानंतर आता जेव्हा मालिका सोडण्याचा निर्णय आपण घेतला तेव्हा त्यांनी चित्रीकरणास सुरुवात केली, असं तिने म्हटलं आहे.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’