भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाशी जोडलेले सामाजिक कार्यकर्ता अण्णा हजारे यांच्या जीवनावर चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाचे नाव ‘अण्णा : किसन बाबूराव हजारे’ असे आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी  ‘द कपिल शर्मा शो’च्या कार्यक्रमालाही उपस्थिती लावली होती. दरम्यान, उरी हल्ल्यात भारताचे १८ जवान शहीद झाले होते. याचे पडसाद पाकिस्तानी कलाकारांच्या भारतात सुरु असणा-या कामावर होत आहेत. पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्याची परवानगी देऊ नये असे मनसेने म्हटले होते. तसेच देशभरातूनही पाकिस्तानी कलाकारांना विरोध केला जात आहे. मात्र, अण्णा हजारे यांनी पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन केले आहे.
आपल्या जीवनावरील आधारित ‘अण्णा : किसन बाबूराव हजारे’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अण्णा एका कार्यक्रमात उपस्थित होते. त्यावेळी पाकिस्तानी कलकारांना मनसेने केलेल्या विरोधाबाबत विचारण्यात आले. तेव्हा ते म्हणाले की, कला आणि युद्ध यांच्यात फरक असतो. या दोन्ही गोष्टींना आपण वेगळं ठेवायला हवं. कला लोकांना प्रेरित करते. पण जर त्याचा वापर चुकीच्या गोष्टीसाठी केला जात असेल तर त्याचा स्वीकार केला जाणार नाही. यावेळी प्रधानमंत्री यांच्या अच्छे दिन या संकल्पवनेरही त्यांनी बरेच ताशेरे ओढले. त्यानंतर उरी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात उठणा-या आवाजांबाबत ते म्हणाले की, जर पाकिस्तान बदलला नाही आणि युद्ध करण्याची वेळ आलीच तर मलाही सीमारेषेवर जायचंय. पण युद्धासाठीची पहिली चाल आपल्या बाजूने केली जाऊ नये. जर पाकिस्तानने असे काही केले तर त्यांना आपण सडेतोड उत्तर द्यायले हवे.
‘अण्णा : किसन बाबूराव हजारे’ या चित्रपटाची लांबी दोन तास दहा मिनिटे आहे. यात अण्णांचा सैन्य दलातील नोकरी ते भ्रष्टाचार विरोधी आंदोलनापर्यंतचा प्रवास दाखविण्यात आलाय. या चित्रपटाचे चित्रीकरण अण्णा हजारेंचे गाव राळेगण सिद्धी, अहमदनगर (महाराष्ट्र), मुंबई, नई दिल्ली, जम्मू आणि कश्मीर, लडाख आणि राजस्थान येथे करण्यात आले आहे. राइज पिक्चर्स प्राइवेट लिमिटेड या चित्रपटाची निर्मिती करत असून दिग्दर्शक शशांक उदापुरकरने याचे दिग्दर्शन केले आहे. पहिल्यांदाच दिग्दर्शन करत असलेला शशांक हा मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे. त्याने चित्रपटात अण्णांची व्यक्तिरेखा साकारण्यासह चित्रपटाची पटकथा आणि संवादही लिहले आहेत. शशांक व्यतिरिक्त ‘अण्णा : किसन बाबूराव हजारे’ चित्रपटामध्ये अभिनेत्री तनिषा मुखर्जीही देखील झळकेल. यात ती एका तरुण पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार असून अण्णा हजारेंच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाशी जोडलेल्या कठीण प्रसंगाना रेकॉर्ड करताना दिसेल. या हिंदी बायोपिकमध्ये तीन गाण्यांचाही समावेश आहे.