बॉलिवूडमध्ये शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष देणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत कतरिना कैफचाही समावेश होतो. कतरिना नेहमीच जिम आणि डाएटकडे काटेकोरपणे लक्ष देत असते. चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यानही ती जिम सेशन्स कधीच टाळत नाही. पण, तुम्हाला माहितीये का? कतरिनाच्या जिममध्ये तिला साथ देण्यासाठी काही खास मंडळी सध्या त्या ठिकाणी दाखल झाले आहेत. जिममधल्या या नव्या साथीदारांसोबत कॅटचं बाँडिंगही चांगलच जुळून आल्याचं पाहायला मिळतंय. तिने पोस्ट केलेले फोटो आणि व्हिडिओ पाहता ते तुमच्याही लक्षात येईल.

कतरिनाच्या जिममध्ये तिला साथ देण्यासाठी नेमकं कोण गेलंय हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. दबंग अभिनेता सलमान खानच्या पुतण्यांनी कॅटला तिच्या जिम सेशनमध्ये साथ दिली आहे. त्यासंबंधीचाच एक फोटो पोस्ट करत कतरिनाने लिहिलंय… ‘द फ्युचर टायगर्स’. या फोटोमध्ये अरबाज खान आणि सोहेल खान या खान बंधूंच्या मुलांसोबत बी- टाऊनची ही हॉट अभिनेत्री डम्बेल्स पकडून बसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सलमानप्रमाणेच त्याच्या पुतण्यांसोबतही तिची ट्युनिंग पाहायला मिळत आहे.

 

वाचा: करणच्या पार्टीत रणबीर-कतरिना धडकले आणि त्यानंतर….

सध्या कतरिना आणि सलमान त्यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठीच जास्त वेळ देत आहेत. अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटातून सलमान आणि कतरिनाची जोडी पुन्हा एकत्र झळकणार आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या निमित्ताने का असेना, पण, चाहत्यांना त्या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्याची संधी मिळणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण सध्या विविध टप्प्यांमध्ये सुरु असून, कतरिना तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन नेहमीच सेटवरचे काही धमाल फोटो पोस्ट करत असते.