सर्वांच्याच आवडीच्या ‘स्पायडर मॅन’ या चित्रपटाच्या सीरिजमधील आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हापासूनच चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळाले. हीच उत्सुकता आणि कुतूहल पाहता ‘स्पायडर मॅन होमकमिंग’ या चित्रपटाचा आणखी एक ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेत दिसतोय नवोदित अभिनेता टॉम हॉलांड. स्पायडर मॅन सीरिजमधील आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारणारा टॉम हा सर्वात तरुण अभिनेता ठरला आहे.

अवघ्या काही मिनिटांच्या या ट्रेलरमधील बराचसा भाग याआधी प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये पाहिल्याचे लक्षात येत असले तरीही काही दृश्ये अनेकांचेच लक्ष वेधतात. हॉलिवूड चित्रपटांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रांविषयी काही वेगळे सांगण्याची गरज नाही हेच ट्रेलरमधील काही दृश्ये सिद्ध करत आहेत. सोशल मीडियावर ‘स्पायडर मॅन होमकमिंग’चा ट्रेलर चर्चेत येण्याचे कारण म्हणजे अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनिअर. ‘आयर्न मॅन’च्या भूमिकेमुळे चर्चेत आलेला रॉबर्ट या चित्रपटामध्ये एका छोटेखानी भूमिकेमध्ये दिसणार असल्याचे म्हटले जातेय. पण ट्रेलरमधील काही दृश्ये पाहता तो या चित्रपटात छोटेखानी पण तितक्याच महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट होते.

मार्वल स्टुडिओज आणि कोलंबिया पिक्चर्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, दिग्दर्शक जॉन वॉट्सने या चित्रपटामध्ये प्रेक्षकांसाठी नक्कीच काहीतरी नवीन थरार आणि नवे कथानक सादर करण्याची तयारी केली असल्याचे चित्रपटाच्या ट्रेलरमधून लक्षात येत आहे. ७ जुलैला ‘स्पायडर मॅन होमकमिंग’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

https://www.instagram.com/p/BSMBxWmjBqY/