‘अंजानी’चा ‘फ्लोरिडा फिल्म फेस्टिव्हल’मध्ये समावेश

छंद आणि हौशेपोटी वसईतील तरुणांनी बनवलेला अंजानी हा लघुभयपट अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात दाखवण्यात येणार आहे. ३ ऑक्टोबर रोजी फ्लोरिडा येथील ‘द हॅलोविन हॉरर फिल्मस’ या महोत्सवात हा लघुपट दाखवण्यात येईल. यापूर्वी १० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवात या लघुपटाला गौरवण्यात आले होते.

वसईतील आयटी क्षेत्रातील तरुण सचिन मेंडिस आणि त्यांच्या मित्रांनी केवळ छंद म्हणून अंजानी हा आठ मिनिटांचा लघुभयपट बनवला होता. सचिन मेंडीस, त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलींनी या लघुपटात काम केले आहे. या लघुपटाला गोम्स आळी येथील अ‍ॅन्सन तुस्कानो याने आवाज आणि संगीत दिले आहे, तर रमेद येथील सॅल्विअर डिमेलो याने छायाचित्रण आणि संकलनाचे काम केले.

चित्रपट क्षेत्राची कसलीही पाश्र्वभूमी नसताना केवळ इंटरनेटच्या मदतीने हा लघुपट बनवण्यात आला आहे. मित्रांना हा लघुपट दाखविल्यांनतर तो उच्च दर्जाचा असल्याचे सांगण्यात आले आणि मग मेंडीस यांनी तो महोत्सवाला पाठवला. त्याला समीक्षकांची दाद मिळाली. मुंबईत भरलेल्या आंतरराष्ट्रीय हॉरर फिल्म फेस्टिवल आणि बेल्जियम, लॉस एंजल्स येथील महोत्सवांसह १० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो गौरवण्यात आला आहे.

या लघुपटाची निवड फ्लोरिडा येथे आयोजित भयपट महोत्सवात निवड करण्यात आली आहे. सप्टेंबरअखेरीस सुरू होणाऱ्या या महोत्सवात जगभरातील भयपट दाखवले जाणार आहे.

फ्लोरिडा येथील भयपट महोत्सवात ‘अंजानी’ दाखवला जाणार आहे, हा सुखद धक्का आहे. फ्लोरिडा येथे जाणे खर्चीक असल्याने प्रत्यक्ष उपस्थित राहता येणे शक्य नाही. मात्र या महोत्सवातही या भयपटाचा गौरव करण्यात येईल, अशी आशा आहे.

सचिन मेंडिस