मराठी संस्कृती म्हणजे दारापुढे अंगण, अंगणातली तुळस आणि सोबतीला इतर झाडं! आज काल अशी संस्कृती फार कमी बघायला मिळते. फार फार तर गावी दिसून येत आपल्याला असं वातावरण. थोडक्यात अंगण ही मराठी संस्कृती कुठेतरी लोप पावत आहे. परंतु, परदेशात राहूनही अभिनेत्री अश्विनी भावे यांनी मात्र या ‘अंगण संस्कृती’चे जतन केले आहे. ‘परसातल्या भाज्या’ ही पारंपारिक पद्धती आज अमेरिकेत जिवंत ठेवलीय ती अश्विनी भावे यांनी!

VIDEO : तुमच्या घरातही दिवाळीची ‘ही’ लक्षणं दिसतात का?

गेल्या काही वर्षांपूर्वी सुरु केलेला हा उपक्रम किती व्यवस्थितरित्या यशस्वी झाला हे लोकांनी पाहावं म्हणून अश्विनी यांनी आपल्या फेसबुकवर ‘द ग्रीन डोअर’ हा नवीन उपक्रम सुरु केलाय. त्यांनी अमेरिकेतील आपल्या राहत्या घरच्या मागच्या कुंपणामध्ये वेगवेगळी फळ, फुलं आणि भाज्यांची बाग तयार केली आहे आणि ह्याच भाज्या त्यांच्या नेहमीच्या स्वयंपाकाचा भाग असतात. आज काल वाढत चाललेला निसर्गाचा लोप हे या मागचं कारण आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. आज कालच्या पिढीला निसर्गाचं महत्त्व पटवून देईल अशी ही मोहीम आहे. अमेरिकेसारख्या प्रगतशील देशामध्ये राहूनही अश्विनी यांनी आपलं मराठीपण जपलं.

दिवाळी २०१७ : ‘तितिक्षा माझ्यासाठी अगदी रव्याच्या लाडवाप्रमाणे…. क्षणार्धात विरघळणारी’

याच बागेमधील भाज्या त्यांच्या घरी आणल्या जातात. सध्या या ‘द ग्रीन डोअर’ या मोहिमेला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळतोय. सोशल मीडियावर नुकताच त्यांच्या बागेमध्ये आलेल्या मॅग्नोलिया या सुंदर फुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या मोहिमेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की ‘प्रत्येकाची श्रीमंतीची कल्पना वेगळी असते आणि ही बागच माझी श्रीमंती आहे’. संस्कृती आणि निसर्ग यांचा सुंदर मेळ घालून त्यांनी या मोहिमेला सुरुवात केली आहे.