‘कमांडो’ हा सिनेमा २०१३ मध्ये आला होता. याच सिनेमाचा सिक्वल म्हणजे ‘कमांडो २’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. तरण आदर्शने ट्विट करुन या सिनेमाचे टिझर शेअर केले आहे. या टिझरमध्ये विद्युत एक अप्रतिम स्टंट करताना दिसत आहे. या टिझरच्या एका दृश्यात विद्युत एका जीपच्या खालून सरकत जाताना दिसत आहे. विद्युत जामवाल आणि अदा शर्मा यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा येत्या ३ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात ईशा गुप्ताचीही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

[jwplayer kfZKFPy2]

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. या पोस्टरमध्ये विद्युतच्या डोळ्याला डॉलरच्या नोटांनी झाकल्याचे दिसत होते. विद्युतच्या या सिनेमाबद्दल त्याच्या चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागून राहिल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रदर्शित करण्यात आलेले हे पोस्टर ‘होमफ्रंट व्हिडिओ गेमच्या लोकप्रिय पोस्टरशी मिळते जूळते असे आहे. यापूर्वी ‘फोर्स’ या सिनेमात विद्युत खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. विद्युत जामवाल सध्या अ‍ॅक्शन हीरो म्हणून नावाजला जातोय. त्याच्या या लोकप्रियतेमुळेच त्याला खलनायकाच्या भूमिकेलाही प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली होती.

बऱ्याच दिवसांच्या खंडानंतर विद्युत आगामी सिनेमातून मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कमांडो २ या सिनेमासाठी त्याने खूप मेहनत देखील घेतल्याचे समजते. आगामी कमांडोच्या सिक्वलमध्ये प्रेक्षकांना थोडा बदल पाहायला मिळणार आहे. या सिनेमाची निर्मिती, दिग्दर्शक देवेन भोजानी करणार आहेत. यापूर्वी भोजानी यांनी ‘साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘सुमित संभाल लेगा’ यासारख्या विनोदी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.

त्यामुळे भोजानी यांच्यासमोर पहिला अॅक्शनपट यशस्वी करण्याचे आव्हान आहे. पहिल्या सिनेमात पूजा चोप्राच्याऐवजी या सिनेमात अदा शर्माची अदा पाहायला मिळणार आहे. तर खलनायकाच्या भूमिकेत फ्रेडी दारुवाला विद्युतशी चार हात करताना दिसेल. फ्रेडी यापूर्वी अक्षय कुमारच्या ‘हॉलिडे’ चित्रपटामध्ये दिसला होता.

[jwplayer 9WJfwJpn]