सेलिब्रिटी जोडप्यांच्या प्रेमकहाण्या, त्यांची नाती आणि अशा बऱ्याच गोष्टी जाणून घेण्यासाठी नेहमीच कुतूहल पाहायला मिळतं. अशाच जोडप्यांच्या यादीतील एक जोडी म्हणजे अभिनेत्री शर्मिला टागोर आणि क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडी. त्यांच्या प्रेमाचे आणि लग्नाचे किस्से अनेकांनाच ठाऊक आहेत. पण, या सेलिब्रिटी, शाही जोडीच्या आयुष्यातील एक किस्सा फार कमी लोकांना माहितीये.

मन्सूर आणि शर्मिला टागोर यांच्या अफेअरच्या चर्चा तेव्हा सर्वत्र सुरु होत्या. त्यावेळी शर्मिला टागोर हिंदी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या अभिनेत्री होत्या. मुख्य म्हणजे तेव्हा ‘अॅन इव्हिनिंग इन पॅरिस’ या चित्रपटामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यावेळी ‘अॅन इव्हिनिंग….’ मध्ये त्यांनी बिकिनी घातल्यामुळे बऱ्याच चर्चा पाहायला मिळाल्या होत्या. मुंबईतही ठिकठिकाणी रस्त्यांवर त्यांचे मोठाले होर्डिंग्ज लागले होते. बिकिनीमधील शर्मिला यांचा तो फोटो चर्चेत असतानाच एक दिवस मन्सूर यांची आई त्यांची भेट घेण्यासाठी मुंबईत येत आहे हे त्यांना कळलं. आता खरी अडचण होती. कारण मन्सूर यांच्या आईला भेटण्यापेक्षा त्यांची आई आपल्याला बिकिनीमध्ये पाहिल याचीच भीती शर्मिला यांना वाटू लागली होती. मन्सूरसोबत आपलं नातं तर तुटणार नाही, याची भीतीसुद्धा त्यांच्या मनात घर करु लागली होती. मन्सूर यांची त्या पोस्टर्सवर काहीच हरकत नव्हती कारण तो शर्मिला यांच्या कामाचाच एक भाग होता.

वाचा : ….म्हणून राजेश खन्ना यांनी बदलली होती त्यांच्या वरातीची वाट

आता समोर कोणताही मार्ग दिसत नाहीये हे जेव्हा शर्मिला यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी लगेचच चित्रपटाच्या निर्मात्यांना फोन करुन मुंबईत ज्या ज्या ठिकाणी बिकिनीमधील ते फोटो लावण्यात आले होते, ते काढून टाकण्यास सांगितले आणि तसंच झालं. कुटुंबामध्ये असणाऱ्या चालीरिती, शाही कुटुंबाचा असणारा रुबाब आणि मोठ्यांच्या समजुती लक्षात घेतच त्यांनी हे पोस्टर हटवण्यास सांगितलं होतं. त्यानंतर शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पतौडी यांचं लग्न झालं.