बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता करण जोहरचा नुकताच वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याने सेलिब्रिटींसाठी एका जंगी पार्टीचे आयोजन केले होते. करणची पार्टी नेहमीच चर्चेचा विषय बनते. कारण, त्याच्या पार्टीइतकं गॉसिप आणखी कुणाच्याच पार्टीत होत नसावं. ऐश्वर्या राय बच्चन, रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, कतरिना कैफ, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्ट आणि इतरही काही सेलिब्रिटी या पार्टीला उपस्थित होते. या पार्टीनंतर अभिनेता रणबीर कपूरबद्दल बऱ्याच चर्चा केल्या गेल्या. त्यापैकीच एक म्हणजे रणबीर आणि त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी कतरिना कैफची पार्टीतील धडक.

वाचा : सुरेश वाडकरांनी माधुरीला दिला होता लग्नासाठी नकार

ब्रेकअप झालेल्या या प्रेमीयुगुलांमध्ये अनपेक्षित गोष्ट पाहायला मिळाली. पार्टीत एकमेकांची भेट झाल्यानंतर या दोघांमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या. विशेष म्हणजे केवळ वरवर गप्पा न मारता ते एकमेकांशी बोलताना बरेच खूश दिसत होते. खरंतर पार्टीमध्ये रणबीर कपूर, आदित्य रॉय कपूर आणि अनुष्का शर्मा यांची गप्पांची मैफल रंगील होती. त्यामध्ये नंतर कतरिनानेही सहभाग घेतला. रणबीर आणि कतरिनामधील खेळीमेळीचे वातावरण पाहून पार्टीमधील उपस्थितांनाही आश्चर्याचा धक्का बसला. या पार्टीत रणबीरसोबत काम केलेल्या आणि त्याच्याशी चांगले मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या अनेक अभिनेत्री उपस्थित होत्या. त्यांना डावलून रणबीर मात्र आदित्य, कतरिना आणि अनुष्कासोबतच रमल्याचे पाहायला मिळाले.

वाचा : सचिनचा बायोपिक म्हणजे ‘झेलो’, कमाल खान बरळला

करणच्या पार्टीत आणखी एक अनपेक्षित गोष्ट घडली. ती म्हणजे, अनेक तरुणांच्या काळजाचा ठोका चुकवणारी जान्हवी कपूर ही रणबीरचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होती. अगदी पार्टी संपेपर्यंत जान्हवीने बॉलिवूडचा हॅण्डसम हंक रणबीरचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण, तिला यात काही यश आले नाही. बहुधा अजूनही रणबीरच्या हृदयात कतरिनाचे राज्य असावे. त्यामुळेच कतरिना समोर असताना त्याला इतर कोणाचीही पर्वा नव्हती.