बॉलिवूडमध्ये आजवर विविध चित्रपटांच्या माध्यमातून कलाकारांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे यात काहीच वाद नाही. विविध धाटणीच्या चित्रपटांमध्ये बालकलाकारांच्या रुपातही काही चेहरे गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. असेच काही चेहरे त्यांनी साकारलेल्या बालकलाकारांच्या भूमिकांसाठी चांगलेलच ओळखले जातात. त्यापैकीच एक चेहरा म्हणजे ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील छोटा सरदार मुलगा. काहीही न बोलता फक्त तारे मोजत जाणारा आणि त्याच्या निरागसतेने अनेकांची मनं जिंकणारा हा मुलगा चित्रपटामध्ये जेव्हा एक संवाद बोलतो तेव्हा तो अनेकांचीच मनं जिंकतो. बऱ्याच वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील छोट्या सरदारच्या तोंडातून ‘तुस्सी जा रहे हो…तुस्सी ना जाओ’ हे वाक्य आजही अनेकांच्या लक्षात राहिलं आहे. पारजान दस्तुर याने ती भूमिका साकारली होती. या चित्रपटाव्यतिरिक्तही पारजानने जाहिराती आणि इतर चित्रपटातून बालकलाकाराच्या भूमिका साकारल्या होत्या. सोशल मीडियावरुन हाती आलेल्या माहितीनुसार पारजानचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले असून सध्यातरी रुपेरी पडद्यावर झळकण्याचे त्याचे प्लॅन्स नाहीत.

पारजानप्रमाणेच इतरही बालकलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. ते छोटे कलाकार आता कसे दिसत असतील? काय करत असतील याविषयी अनेकांनाच कुतुहल आहे. तेव्हा, जाणून घेऊया अशाच काही सेलिब्रिटी बालकलाकारांविषयी.

सना सईद-
‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात शाहरुखच्या मुलीची म्हणजेच अंजलीची भूमिका साकारणारी सनी सईद सुद्धा अनेकांच्या पसंतीस उतरली होती. त्यानंतर करण जोहरच्या ‘स्टुडण्ट ऑफ द इयर’ या चित्रपटातूनही सना झळकली होती. काही रिअॅलिटी शो च्या माध्यमातूनही सना प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यामुळे किंग खानची ही ऑनस्क्रिन मुलगी म्हणजेच नटखट अंजली आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

एहसास चन्ना-
मुलाच्या भूमिकेमध्ये बालकलाकार एहसासने अनेकांचीच मनं जिंकली होती. ‘कभी अलविदा ना केहेना’ या चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि प्रिती झिंटाच्या मुलाची भूमिका दुसरी तिसरी कोणी नाही, तर एहसासने साकारली होती. ‘वास्तुशास्त्र’ या भयपटामध्येही तिने सुश्मिता सेनच्या मुलाची भूमिका साकारली होती. एहसास सध्या विविध टीव्ही मालिका आणि युट्यूब सिरिजद्वारे अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे.

झनक शुक्ला-
यंत्रमानव, रोबोट याविषयी काही वर्षांपूर्वी सर्वच स्तरांमध्ये प्रचंड वेड पाहायला मिळालं होतं. भारतात पाहायला मिळालेल्या या वेडाचं कारण म्हणजे एक मालिका. ‘करिश्मा का करिश्मा’ या मालिकेद्वारे एका सुंदर आणि निरागस रोबोच्या भूमिकेतून झनल शुक्ला प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिली होती. ‘कल हो ना हो’ या चित्रपटामध्येही ती अभिनेत्री प्रिती झिंटाच्या लहान बहिणीच्या भूमिकेतही झळकली होती.

किंशुक वैद्य-
‘शाका लाका बूमबूम’ या मालिकेमुळे त्याच्या अनोख्या पेन्सिलमुळे प्रेकांच्या घराघरात किंबहुना बच्चेकंपनीच्या कंपास पेटीमध्ये पोहोचलेला एक बालकलाकार म्हणजे किंशुक वैद्य. किंशुक सध्या त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतो. तसेच त्याने काही टेलिव्हीजन मालिकांमध्येही काम केले आहे. ‘प्यार तुने क्या किया’ या सिरीजमध्येही किंशुक झळकला होता.