बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांचा चित्रपट ‘जब हॅरी मेट सेजल’ हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटाचे प्रोमो प्रदर्शित करण्यात येत आहेत. त्यामधील एका प्रोमोमध्ये असलेल्या ‘इंटरकोर्स’ या शब्दावरून वाद उद्भवला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी हा शब्द चित्रटातून हटविण्याचा निर्णय घेतला आहे. पण, एका अटीवर ते ‘इंटरकोर्स’ शब्द चित्रपटात तसाच ठेवण्यास तयार आहेत. सामान्य जनतेने पाठिंबा म्हणून ‘इंटरकोर्स’ शब्दासाठी मतदान केल्यास आणि त्यातून किमान एक लाख मतं जरी मिळाली तरी ‘जब हॅरी मेट सेजल’च्या प्रोमो आणि चित्रपटातील हा शब्द वगळला जाणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे.

वाचा : सुव्रत-मृण्मयीच्या ‘लग्ना’चा फोटो पाहिलात का?

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत निहलानी म्हणाले की, तुम्ही मतदान घ्या, मी तो शब्द (इंटरकोर्स) प्रोमो आणि चित्रपटात तसाच ठेवेन. त्यासाठी मला किमान एक लाख मतं हवी आहेत. भारत बदलला आहे का ते मला बघायचं आहे. आपल्या १२ वर्षांच्या मुलाला त्या शब्दाचा (इंटरकोर्स) अर्थ कळावा असं भारतातील कुटुंबांना वाटतं का ते मला बघायचं आहे.

‘जब हॅरी मेट सेजल’ चित्रपटाचा दुसरा मिनी प्रोमो सोमवारी प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये अनुष्का शर्माने एका दृश्यात इंटरकोर्स या शब्दाचा उच्चार केला आहे. त्यावर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला असून प्रोमो टेलिव्हिजनर दाखवण्यास नकार दिला. प्रोमो बघितल्यानंतर निहलानी एका वृत्तपत्राशी बोलताना म्हणाले की, इंटरकोर्स शब्द असलेला संवाद डिलिट करण्याच्या अटीवर आम्ही चित्रपटाला यूए सर्टिफिकेट दिले आहे. त्यावर अजून त्यांचे उत्तर येणं अपेक्षित आहे. अजूनही आमच्याकडून प्रोमोला परवानगी मिळालेली नाही.

वाचा : नागिण, माशी झाली आता आणखी एक भंपक हिंदी मालिका तुमच्या भेटीला

आतापर्यंत चित्रपटाच्या टीमने तीन मिनी ट्रेलर्स प्रसिद्ध केलेले आहेत. यामध्ये शाहरुखला ‘हॅरी’च्या तर अनुष्का शर्माला ‘सेजल’ या गुजराती मुलीच्या रुपात समोर आणण्यात आले आहे. ‘जब हॅरी मेट सेजल’  हा चित्रपट येत्या ४ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.