गोव्यामध्ये सध्या कंडोम (निरोध) आणि गर्भनिरोधक गोळ्यांच्या जाहिरातीसंदर्भात महिलावर्गाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. गोव्यातील महिला संघटनेने बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या कंडोमच्या जाहिरातीसोबतच अन्‍य मॉडेल्‍सद्वारा करण्यात आलेल्या गर्भनिरोधक गोळ्यांच्या जाहिरातीवर देखील आक्षेप घेतला आहे. हिंदू जनजागृती समितीच्या रणरागिनी संघटनेने गोव्याच्या राज्य महिला आयोगाकडे संबंधित जाहिराती हटविण्याची मागणी केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिला संघटनेने केलेली ही मागणी पूर्ण करण्यासाठी गोवा महिला आयोगाने देखील सकारात्मक विचार केला असून संबंधित कंपन्यांना यासंदर्भात नोटीस पाठण्याची तयारी दर्शवली आहे.

सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या जाहिरातीमुळे महिलांना एखाद्या वस्तुप्रमाणे सादर केले जाते. त्यामुळे महिलांना परिसरातून जाताना एक प्रकारची घुसमट निर्माण होते, अशी भूमिका महिला संघटनेने मांडली आहे. संघटनेतील एका महिलेने दिलेल्या माहितीनुसार, गोव्यातील अनेक महिलांनी सनी लिओनी तसेच अन्य अश्लील जाहिरातीबाजी संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. परिसरातील अनेक महिला आमच्यासोबत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  गोव्यातील महिलांनी  राज्य महिला आयोगाला निवेदनाद्वारे जाहिराती हटविण्याची मागणी केली आहे. निवेदनामध्ये विशेष करुन गर्भनिरोधक गोळ्यांच्या जाहिरातीमध्ये वापरण्यात आलेल्या छायाचित्राकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. खासगी बस सेवा तसेच इतर ठिकाणी गर्भनिरोधक गोळ्यांसदर्भातील या जाहिराती झळकत आहेत. दरम्यान गोवा महिला आयोगाच्या अध्यक्षा विद्या शेठ तनावडे यांनी यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले आहे.  लवकरच अशा जाहिरातदार कंपन्यांना नोटीस पाठवू. तसेच या प्रकरणाची पूर्ण चौकशी देखील करु, असे त्या म्हणाल्या.

पॉर्नपटांना अलविदा करून बॉलीवूडमध्ये हळू हळू जम बसवत असलेल्या सनी लिओनीवर कम्युनिस्ट पक्षाचे नेते अतुलकुमार अंजन यांनी निशाणा साधला होता. तिच्या कंडोमच्या जाहिरातीवर आक्षेप घेताना देशात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होण्यास सनी जबाबदार असल्याचेही ते म्हणाले होते. माझा कंडोमला विरोध नाही तर सनी लिओनीला आहे. ही अशाप्रकारची जाहिरात टेलिव्हिजनवर दाखविलीच कशी जाते? याला जाहिरात म्हणतात का? अशा प्रश्नांची सरबत्तीच अंजन यांनी उत्तरप्रदेशमधील एका सभेवेळी मांडली होती. सनीच्या जाहिरातींमुळे लैंगिकतेला उत्तेजना मिळत असून जबाबदारीची भावना संपुष्टात येत असल्याचे अंजनकुमार म्हणाले होते. जाहिरातीच्या सुरुवातीच्या काळात निर्माण झालेल्या या वादाला गोव्यातील महिला संघटनेने पुन्हा एकदा समोर आणल्याचे दिसते. महिलांच्या या आक्रमकतेमुळे गोव्यातून या सनी लिओनीच्या जाहिरातीवर कधीपर्यंत कारवाई होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.