मित्र म्हणजे असा जोडीदार की ज्याला आपण कोणत्याही वेळी हक्काने हाक देऊ शकतो. त्याच्याशी वादविवाद करु शकतो, मैत्रीत जेवढी आपुलकी, काळजी असते तेवढीच भांडणे देखील असतात. म्हणूनच कदाचित ‘मैत्रीसाठी काहीही…’ असं म्हणणारे अनेक दोस्त आपल्याला पाहायला मिळतात. या ‘काहीही…’ प्रकारातल्या मित्रांमध्ये यारी- दोस्तीतल्या गटर आणि नाला या दोन मित्रांना मोडता येईल. ‘दोस्ती के लिये जान भी हाजीर है’ असे म्हणणारे ही दोघे, लवकरच ‘यारी दोस्ती’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. शांतनू अनंत तांबे दिग्दर्शित ‘यारी दोस्ती’ या सिनेमातील हे दोन कलाकार म्हणजेच हंसराज जगताप आणि आकाश वाघमोडे. सिनेमात आपल्या मैत्रीची टशन दाखवणारे हे दोघे खऱ्या आयुष्यात मात्र खूप चांगले मित्र आहेत. ही मैत्री होण्यामागची गोष्टही तेवढीच रंजक आहे.
सिनेमातील गटर- नाला या भूमिकेला वास्तव्यात आणण्यासाठी दिग्दर्शक शांतनू अनंत तांबे यांनी हंसराज-आकाशची मैत्री जुळून आणण्यास भन्नाट शक्कल लढवली होती. हंसराज मूळचा बीड तर आकाश पुण्याचा असल्याकारणामुळे ‘यारी दोस्ती’ या सिनेमाच्या निमित्ताने हे दोघे प्रथमच एकमेकांना भेटत होते. सिनेमात त्यांची मैत्री नैसर्गिक वाटावी म्हणून, या दोघांची रिअल लाईफमध्ये मैत्री होणे गरजेचे होते. त्यामुळे दिग्दर्शक शांतनू अनंत तांबे यांनी ‘यारी दोस्ती’ सिनेमाच्या चित्रीकरणापूर्वी हंसराज आणि आकाशचा एकत्र कार्यशाळा घेतली. या दोघांना मुंबईत एका खोलीत तब्बल १० दिवस एकटं ठेवण्यात आलं होतं. हंसराज आणि आकाशने या १० दिवसात एकमेकांना चांगलीच साथ दिली. बाहेरच्या जगापासून दूर अशा त्या खोलीत दोघांची चांगलीच गट्टी जमली. विविध प्रांतातून आल्यामुळे या दोघांची बोलीभाषा आणि राहणीमानात भरपूर फरक होता, मात्र इतके दिवस एकत्र राहिल्याने त्यांच्यातली ही विविधतेची पोकळीही नकळत भरुन निघाली. सिनेमाच्या प्रमुख भूमिकांना न्याय देण्यासाठी ‘गटर- नाला’ ही दोन आदर्श मित्र सिनेमात दाखल झाली. हा सिनेमा चार मित्रांवर आधारित असल्यामुळे त्यात या दोघांबरोबरच आशिष गाडे आणि सुमित भोकसे यांची देखील मुख्य भूमिका असणार आहे. शिवाय संदीप गायकवाड, मिताली मयेकर, नम्रता जाधव, श्रेयस राजे, निशा परुळेकर, अशोक पावडे, जनार्दन सिंग, मनीष शिंदे यांच्यादेखील ठळक भूमिका पाहायला मिळणार असून ग्लॅमरर्स अभिनेत्री मनीषा केळकरही विशेष भूमिकेत दिसणार आहे.
किशोरवयीन मुलांच्या भावविश्वावर आधारित असलेला हा सिनेमा १६ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बिपीन शाह मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि पॅशनवर्ल्ड एंटरटेनमेंट्स निर्मित हा सिनेमा प्रत्येकाला आपल्या खास मित्राची आठवण करून देणारा ठरेल, यात शंका नाही.