हा देह, हे मन, हे आयुष्य याबद्दल आपण बेपर्वा असतो. माणूस म्हणून जगता येणं ही एक मोठी दुर्लभ संधी आहे, याची जाणीवदेखील आपल्याला शिवत नाही. जन्मल्यापासून ‘मी’च्या इच्छेनुसार आणि ज्यांना मी ‘माझे’ मानतो त्यांच्या इच्छेनुसार मी नुसता जगत राहातो! भौतिकाचा पसारा सांभाळताना, वाढवताना या पसाऱ्यापलीकडे माझी काही ओळख आहे का, माझं काही अस्तित्व आहे का, याचा विचारही मला कधी करावासा वाटत नाही. पसारा हीच माझी ओळख बनते आणि ज्याचा पसारा अधिक त्याला जग जास्त ओळख देत असल्यानं पसाऱ्यातच मी अखेपर्यंत गुंतून राहातो आणि त्या पसाऱ्याच्या इच्छेतच शेवटचा श्वास घेतो! तेव्हा मला लाभलेल्या आयुष्याच्या या अमूल्य संधीवर, देहासारख्या उपकरणावर आणि मनासारख्या शक्तीच्या स्त्रोतावरही माझं खरं प्रेम नाही.. मग सद्गुरूंवर प्रेम कसं साधणार? पण ते प्रेम मुळात आहे तरी काय, त्याची सुरुवात कुठून होईल? तर हे जीवन, हा देह, हे मन जर त्यांच्या विचारानं भरून गेलं तर त्याचा खरा लाभ घेता येईल, या विचारानं जागं होणं, ही त्या प्रेमजाणिवेची सुरुवात आहे! या घडीला मन अशाश्वत जगाच्या ओढीनं भरलं आणि भारलं आहे. त्यामुळे हा देहही त्या ओढीनुसार राबविला जात आहे. त्यातच आयुष्यातला प्रत्येक क्षण सरत आहे. बरं या सर्व खस्ता खाऊनही खरं समाधान आणि खरी मन:शांती मिळते का? तर नाही! त्यामुळे शाश्वताच्या ओढीनं जर हे मन भारलं तर देहदेखील त्याच शाश्वताच्या प्राप्तीसाठी कार्यरत राहील. मग जगण्यातला प्रत्येक क्षणदेखील त्याच कार्यासाठी वेचला जात असल्यानं सार्थकी लागेल. एखादा माणूस सरधोपट समजानुसार आध्यात्मिक नसेल, पण तो एखाद्या व्यापक विचाराची, व्यापक तत्त्वाची कास धरून जगत असेल तरी त्याचं जीवन व्यापक होतंच. त्याच्यातला स्वार्थ, संकुचितपणा, क्षुद्रत्व लोपतं आणि त्याच्या नि:स्वार्थ, व्यापक आणि दिव्य जीवनानं अनेकांना नि:स्वार्थ जगण्याची प्रेरणा मिळत राहाते. मग जो खऱ्या श्रीसद्गुरूंच्या आधारावर जीवनातला प्रत्येक क्षण व्यतीत करीत आहे त्याच्या जीवनाचा किती खोलवर अमीट ठसा उमटत असेल! एवढंच नाही तर तो काळाच्या पडद्याआड गेला तरीही त्याच्या चरित्रातून अनंत काळ अनंत लोकांच्या अंत:करणावर भावसंस्कार होतच राहातात. त्यामुळे सद्गुरूंच्या आधारावर जगण्याचा विचार ही त्यांच्यावरील प्रेमाची सुरुवात आहे. त्यासाठी घरदार सोडायला नको, घरादाराची वाताहत करायला नको.. कारण ते त्यांचंच आहे ना? त्यांच्याच इच्छेनं माझ्या वाटय़ाला आलं आहे ना? मग त्या घरादाराची, माझ्या माणसांची योग्य ती काळजी घेत, त्यांच्याप्रतीची सर्व कर्तव्यं करत असतानाच मन मात्र सद्गुरू विचारांत केंद्रित करण्याचा अभ्यास हा त्या प्रेमपथावरील वाटचालीचा आरंभ आहे. ‘मी’ आणि ‘माझे’च्या जाणिवेपासून देहानं नव्हे, मनानं दूर व्हायचं आहे. देह दूर राहिला, पण मन त्यातच रूतून राहिलं, तर काय उपयोग? उलट मन दूर राहिलं आणि देह त्यातच राहिला तरी काही धोका नाही! देह जगाकडे आणि मन शाश्वताकडे वळविण्याची कला आत्मसात करण्याचा अभ्यास सुरू करणं म्हणजे सद्गुरूंवर प्रेम सुरू करणं आहे! हा अभ्यास जर प्रामाणिकपणे आणि चिकाटीनं होत राहिला, तर मग त्यांचा विचार आणि माझा विचार यात  भेद राहाणार नाही. मग त्यांची इच्छा आणि माझी इच्छा वेगळी उरणार नाही. त्यांचं ध्येय आणि माझं ध्येय भिन्न राहाणार नाही. त्यांची आवड आणि माझी आवड यात विसंगती उरणार नाही. मग याच जगात निस्संग, निर्मोह, नि:स्वार्थ, निर्भय, नि:शंक, निर्लिप्त, निश्चिंत, निर्विकल्प, निर्धोक वावरणं सहज होईल. असं जगणं खरं प्रेममय आणि प्रेमपरिपूर्ण होईल.

Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
MPSC interview
‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…

चैतन्य प्रेम