विनाहेल्मेट गाडी चालवणाऱ्यांना फटका; ७२ चालक आणि मागे बसलेल्या ३० जणांचा मृत्यू

विनाहेल्मेट दुचाकी चालवू नका, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी अनेकदा करूनही त्याचा काहीच परिणाम मुंबईकरांवर होत नसल्याचे समोर येत आहे. जानेवारी ते जून २०१६ या सहा महिन्यांमध्ये झालेल्या दुचाकी अपघातांमध्ये तब्बल १०२ जण ठार झाले आहेत. यात ७० जण दुचाकीस्वार होते, तर मागे बसलेल्या ३० जणांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय २२३ जण जखमी झाले आहेत. एकीकडे राज्य सरकारने लागू केलेल्या हेल्मेटसक्तीला सर्वच स्तरांमधून विरोध होत असताना ही आकडेवारी हेल्मेटसक्ती अनिवार्य असल्याचेच स्पष्ट करीत आहे.

दुचाकींच्या अपघातांत हेल्मेट न घातल्याने चालक आणि त्याच्या मागे बसलेल्या प्रवाशाचा मृत्यू होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे यंदा जानेवारी महिन्यापासून राज्य सरकारने हेल्मेटसक्तीसाठी विविध उपाय सुरू केले आहेत. या उपायांना दुचाकीस्वारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर सरकारने ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ असाही निर्णय घेतला. मात्र या निर्णयाला विरोध झाल्यानंतर तो मागे घेण्याची वेळ राज्य सरकारवर आली. आता पेट्रोल पंपावर हेल्मेट न घालता येणाऱ्या दुचाकीस्वारांची नोंद करण्याचे काम वाहतूक पोलिसांनी सुरू केले आहे.

हेल्मेटसक्ती हा पोलिसांच्या फायद्यासाठीचा निर्णय नसून दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय आहे. या वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये झालेल्या दुचाकींच्या अपघातांत एकूण १०२ जण मृत्युमुखी पडले. हे मृत्यू टळावेत, यासाठीच हेल्मेटसक्ती आवश्यक असल्याचे वाहतूक विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. याच कालावधीत २२३ जण दुचाकींच्या अपघातांत जखमी झाले आहेत.

mv04