५०० चौरस फुटांची घरे देण्याचा प्रस्ताव
मुंबईतील वरळी, डिलाईल रोड, नायगाव व शिवडी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची योजना अंतिम टप्प्यात आली असून, तेथील रहिवाशांना ५०० चौरस फुटांची (चटई क्षेत्र) मोफत घरे देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे समजते. या भागांतील घरांचे दर लक्षात घेता, पुनर्विकास योजना यशस्वी झाल्यास तेथील रहिवासी कोटय़धीश बनतील असे सरकारी सूत्राकडून सांगण्यात आले.
मुंबईतील या चार विभागांत सुमारे शंभर एकरांवर बीडीडी चाळी आहेत. वरळीत ६० एकरांवर चाळी उभ्या आहेत. त्यांतील घरांची संख्या १६ हजारांच्या वर आहे. मात्र या चाळी अतिशय जुन्या व जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारने या चाळींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. या चारही विभागांतील चाळींचा म्हाडा पुनर्विकास करणार आहे.
बीडीडी चाळींची पुनर्विकास योजना आता अंतिम टप्प्यात आहे. त्यांतर्गत पुनर्वसन, म्हाडाकरिता सोडत पद्धतीने विकण्यासाठी आणि खुल्या बाजारात विक्रीसाठी अशा तीन प्रकारची घरे बांधण्यात येणार आहेत. खुल्या बाजारातील विक्रीसाठी फक्त उच्च उत्पन्न गटासाठी घरे बांधण्यात येणार आहेत. पुनर्वसन प्रकल्पांतर्गत चाळीतील रहिवाशांना ५०० चौरस फुटांची घरे मोफत व मालकी हक्काने देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. शिवडी येथील बीडीडी चाळी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर आहेत. परंतु त्याचा पुनर्विकासही म्हाडाच करणार आहे.