धुळवडीच्या उत्साहात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तब्बल ८,६२२ वाहनचालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी सोमवारी कारवाई केली. हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणे, दुचाकीवर तिघांनी प्रवास करणे, मद्यसेवन करून वाहन चालविणे आदी गुन्ह्य़ांचा त्यात समावेश आहे.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी वाहतूक पोलीस ठिकठिकाणी तैनात होते. सोमवारी दिवसभरात मद्यसेवन करुन वाहने चालविणाऱ्या ४९१ जणांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाई केली, तसेच हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या तब्बल ५९६९ जणांची धरपकड करण्यात आली. अनेक ठिकाणी दुचाकीवरुन तीनजण प्रवास करताना दिसत होते. अशा सुमारे ४८९ दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. भरधाव वाहने हाकणाऱ्या २८ जणांनाही कारवाईला सामोरे जावे लागले, तर अन्य नियमांचे पालन न करणाऱ्या तब्बल १६४५ जणांविरुद्धही वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.