तत्कालीन लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांच्या जन्मतारखेबाबत शंका उपस्थित करणाऱ्या जनरल दीपक कपूर व त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांची घरे आदर्शमध्ये असल्याने सिंग यांनी आदर्श सोसायटीबाबत वाद निर्माण केला व सीबीआयनेदेखील याबाबत खोटे आरोपपत्र तयार केले असा आरोप आदर्श सोसायटीच्या सदस्यांनी शनिवारी केला. माहिती अधिकाराअंतर्गत हाती आलेल्या कागदपत्रांमधून ही जागा नौदलाची नसल्याचे तसेच कारगील शहीदांच्या कुटुंबियांसाठी नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे  लवकर सदनिकांमध्ये राहण्यास परवानगी देण्याची मागणी सदस्यांनी केली.
आदर्श सोसायटीचा वाद २०१० पासून सुरू आहे. कफ परेड येथे नौदलाच्या जागेत आदर्श टॉवरची जागा असून कारगील युद्धातील शहीदांच्या कुटुबियांसाठी घरे राखीव ठेवली असल्याचे आरोप झाल्यानंतर या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. या सर्व संदर्भात न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान माहिती अधिकाराअंतर्गत कागदपत्रे मिळण्याचा मार्ग ७ जुलै २०१४ मध्ये मोकळा झाला. नव्या केंद्र सरकारमुळे नौदलाकडून आदर्शसंबंधीची  कागदपत्रे मिळू शकली, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष ब्रिगेडीअर टी. के. सिन्हा यांनी दिली. ३ डिसेंबर रोजी आदर्शच्या जमिनीच्या मालकीसंबंधी कोणतीही कागदपत्रे संरक्षण मंत्रालयाकडे नसल्याचे पत्र मिळाले तर २० डिसेंबर रोजी मिळालेल्या पत्रात मिलिटरी लॅण्ड रजिस्ट्रेशनमध्ये या जागेचा उल्लेख नसल्याचे तसेच सरकारकडून ती घेण्यासंबंधी कोणतीही प्रक्रिया सुरू नसल्याचे स्पष्ट करण्यात आले, असेही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

*व्ही. के. सिंग यांनीच तत्कालीन संरक्षणमंत्री ए. के. अॅण्टोनी यांना आदर्शमध्ये घोटाळा असल्याचे सांगितले.
*आदर्श सोसायटीने महाराष्ट्र सरकारकडून २७ कोटी रुपयांना जमीन खरेदी केली.
*आदर्शच्या १०४ घरांपैकी ६० घरे नौदल व लष्कर अधिकाऱ्यांच्या नावे
*१२ जानेवारी रोजी होत असलेल्या सुनावणीत माहिती अधिकाराअंतर्गत हाती आलेली कागदपत्रे ठेवणार.
*वैयक्तिक आरोपपत्राबाबत भाष्य नाही. त्याबाबत सीबीआय  तपास झाल्यावरच विचार करावा. इतर रहिवाशांना राहण्याची परवानगी द्यावी.

आदर्श गृहनिर्माण सदस्यांच्या म्हणण्यानुसार..
आदर्श सोसायटीबाबत २००३-०४ मध्येच संपूर्ण तपासणी झाली असून त्यानंतर याबाबत आक्षेप नोंदवण्यात आलेले नाहीत. हा तपास पुन्हा सुरू केल्यास प्रसारमाध्यमातील (मॅनिप्युलेटेड) वार्ताकनांमुळे गैरप्रचार होऊ शकतो, असे पत्र सदर्न कमांडच्या लॅण्ड ब्रान्चकडून ६ एप्रिल २०१० रोजी देण्यात आले होते. आदर्शबाबत त्यानंतर काही महिन्यांनी बातम्या येण्यास सुरुवात झाली.