हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात चांगले बदल; ‘सफर’ची आकडेवारी

हिवाळ्यात मुंबईची प्रदूषित झालेली हवा आता उन्हाळ्यात मात्र शुद्ध झाल्याचे दिसत असून गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या हवेत झालेला हा बदल पावसाळ्यापर्यंत कायम राहणार आहे. ‘सफर’ उपक्रमांतर्गत दररोज जाहीर करण्यात येणारा हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात चांगले बदल झाले असून रविवारी हा निर्देशांक ७० वर स्थिरावला होता. हा निर्देशांक जितका अधिक तितकी हवा अधिक प्रदूषित असे प्रमाण असून हिवाळ्यात मुंबईचा हा निर्देशांक ३०० च्या वर पोहोचला होता.

गेल्या काही महिन्यांपासून मुंबईचे ‘हवा’मान खालावलेले होते. त्यामुळे अनेकांना श्वसनाच्या विकारांनी ग्रासल्याचे चित्र शहरात निर्माण झाले होते. प्रदूषित हवेच्या प्रमाणात चढ-उतार होत असले तरी हवा खराब असल्याचेच निदर्शनास आले होते. हवेतील जड मूलकणांच्या प्रमाणावरून हवेतील प्रदूषण नेमके किती यावरून हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ‘सफर’ उपक्रमांतर्गत काढण्यात येतो. हा गुणवत्ता निर्देशांक जितका अधिक तितके प्रदूषण अधिक असे मानले जाते.

हा निर्देशांक २०० हून अधिक झाला, तर शहरातील हवा खूप प्रदूषित झाल्याचे मानण्यात येते. देशातील चार प्रमुख महानगरांच्या हवेतील गुणवत्ता निर्देशांकाचे प्रमाण ‘सफर’ उपक्रमांतर्गत काढण्यात येते. हिवाळ्यात हा निर्देशांक मुंबईत ३५० च्या आसपास पोहोचल्याने मुंबईतील हवा देशातील अन्य महानगरांच्या तुलनेत सर्वाधिक दूषित झाल्याचे पुढे आले होते. मात्र आता हा निर्देशांक बराच खाली आला असून गेल्या आठवडाभरात हा निर्देशांक ५७ ते ७० या प्रमाणात दिसून आला.

तापमानवाढीनंतर समुद्रावरून वेगवान वारे शहराकडे वाहत आहेत. हे वारे वाहिल्याने शहरात दिवसभरात तयार झालेली प्रदूषित हवा वाहून जाते. त्यामुळे शहरावरील वातावरणात प्रदूषित हवा न राहता केवळ शुद्ध हवाच शहरात राहते. हिवाळ्यात मात्र, वारे वाहण्याचे प्रमाण नगण्य होते. शहरात दिवसभरात निर्माण झालेली हवा वातवरणात कायम राहत होती. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढले होते. मात्र आता तशी स्थिती नसून पावसाळ्यातही मुंबईतील प्रदूषणाचे प्रमाण कमी राहील.  – डॉ. गुरफान बेग, संचालक, ‘सफर’ उपक्रम

untitled-17