अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या चौघांना माणगाव सत्र न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. उमेश हनुमान जामकर, रुपेश परशुराम फुलारे, निखिल गजानन ठाकूर आणि महेंद्र मुकूंद कांबळे अशी या चौघांची नावे आहेत.

रोहा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पीडित मुलीची घरची परिस्थिती बेताची असल्याने ती घरकाम आणि मोलमजुरी करत होती. भोळसरपणा आणि गरिबीचा फायदा घेऊन या चौघांनी तिच्यावर बलात्कार केला. उमेश जामकर, रुपेश फुलारे, निखिल ठाकूर यांनी गावातील ठिकाणी विविध ठिकाणी वेळोवेळी बलात्कार केला. तर महेंद्र कांबळे याने पीडित मुलीच्या घरात घुसून बलात्कार केला. यातून मुलीस दिवस गेले. अल्पवयीन मुलीच्या गर्भधारणेनंतर हा प्रकार उघडकीस आला.
मुलीच्या वडिलांनी ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यात निर्णय न झाल्याने ५ सप्टेंबर २०१५ ला रितसर फिर्याद दाखल केली. रोहा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३७६ आणि बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पीडित मुलीची अलिबाग येथील शासकीय रुग्णालयात तपासणी करण्यात आली. या गर्भधारणेतून पीडित अल्पवयीन मुलीने एका मुलाला जन्म दिला. न्यायवैद्यक तपासणीत उमेश जामकर हा या मुलाचा पिता असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस उपनिरीक्षक साळवे यांनी यांनी सदर प्रकरणाचा तपास करून दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले. माणगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रसाद पाटील यांनी ९ जणांच्या साक्षी नोंदवल्या. यात पीडित मुलगी, तिचे वडील, वैद्यकीय अधिकारी, तपासी महिला पोलीस कर्मचारी यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. ठोस पुराव्याअंती चौघांनाही न्यायालयाने दोषी ठरवले व १० वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी सहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडामधून जमा झालेल्या रकमेतील २० हजार रुपये पीडित मुलगी व तिच्या मुलाला नुकसान भरपाईपोटी देण्याचे निर्देश न्यायालयाने यावेळी दिले.