अपघातग्रस्तांसाठी प्रत्येक स्थानकाबाहेर आवश्यक उपकरणांनी रुग्णवाहिका सज्ज असल्याचा वारंवार राज्य सरकारने केलेला दावा सपशेल खोटा असून, या रुग्णवाहिका निरुपयोगी असल्याचे न्यायालयीन अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत उघड झाले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा अहवाल चुकीचा असल्याचा कांगावा सरकारने केला.
  रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय केंद्र स्थापन करण्याचे आणि प्रत्येक स्थानकाबाहेर अद्ययावत उपकरणांनी सज्ज रुग्णवाहिका तैनात करण्याचे आदेश देण्याची याचिका दाखल झाली आहे. त्यावर यापूर्वी झालेल्या सुनावणीच्या वेळेस केवळ अपघातग्रस्तांसाठी प्रत्येक रेल्वे स्थानकाबाहेर रुग्णवाहिका सज्ज करण्यात आल्याचा दावा सरकारने केला होता. मात्र त्यांचा हा दावा खोटा असून या रुग्णवाहिका इतरत्र वापरल्या जात असल्याचे याचिकाकर्त्यांनी दाखवून दिले. न्यायालयाने परिस्थितीची शहानिशा करण्याची जबाबदारी न्यायालयीन अधिकाऱ्यांवर सोपवली होती.
त्यानुसार या अधिकाऱ्यांनी तिन्ही मार्गावरील स्थानकांना अचानक भेटी दिल्या असता, सरकारचा दावा खोटा असल्याचे उघडकीस आले. काही स्थानकांवर रुग्णवाहिका होत्या. पण चालक व डॉक्टर नव्हते, काही स्थानकांवर रुग्णवाहिका आणि डॉक्टर दोघेही नव्हते, काही स्थानकांवर डॉक्टरांच्या येण्याच्या वेळाच निश्चित नव्हत्या, काही स्थानकांवर रुग्णवाहिका आहेत, पण त्या निरुपयोगी होत्या, तर काही स्थानकांवर डॉक्टर आणि रुग्णवाहिका असूनही डॉक्टरला त्यातील उपकरणे कशी हाताळावीत हेच माहीत नसल्याचे या अहवालातून पुढे आले.