जेमतेम सहा महिन्यांपूर्वी झालेल्या कोपरी येथील पोटनिवडणुकीत एकमेकांना शह देण्यासाठी अगदी हमरीतुमरीवर उतरलेले शिवसेनेचे आमदार एकनाथ िशदे आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक रवींद्र फाटक यांना शनिवारी गळ्यात गळे घालताना बघून राजकारणातील समीकरणे कशी झपाटय़ाने बदलत असतात, याचा प्रत्यय पुन्हा एकदा सर्वाना आला.
कोपरी येथील निवडणुकीत मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर शिवसेनेने एक कार्टून तयार केले होते. त्यामध्ये िशदे यांच्या विजयी छबीसह ठाण्यात फाटक बंद, असा संदेश देण्यात आला होता. काँग्रेस पक्षापेक्षा फाटक यांची खिल्ली उडविणे हा एकमेव उद्देश यामागे होता. हे कार्टून पुढे किती तरी दिवस सोशल मीडियावरून फिरत होते. त्यामुळे संतप्त झालेल्या फाटकांनी येत्या विधानसभेत एकनाथाला अनाथ केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे जाहीर आव्हान देत आगामी संघर्षांचे बिगुल फुंकले होते.
प्रत्यक्षात घडले मात्र उलटेच. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला मोठा पराभव आणि राणे पुत्रांकडून सातत्याने मिळणारी उपरेपणाची वागणूक यामुळे सततच्या संघर्षांला कंटाळलेल्या फाटक यांनी एकनाथ िशदे यांचेच बोट पकडून शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला आणि राजकारणातील अनिश्चिततेचे दर्शन घडविले. आगामी विधानसभा निवडणुकीत एकनाथ िशदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे प्रबळ दावेदार म्हणून गेल्या दोन वर्षांपासून फाटक यांचे नाव घेतले जात होते. मनसेच्या मदतीने ठाणे महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपद मिळताच त्यांनी राष्ट्रवादीला हाताशी घेत शिवसेनेच्या आर्थिक नाडय़ा वर्षभर कापून टाकल्या होत्या. एकनाथ िशदे यांचे खच्चीकरण हा एकमेव उद्देश त्यामागे होता.  
गॉडफादर असलेल्या नारायण राणे यांच्या दोन्ही पुत्रांसोबत त्यांचे वरचेवर खटके उडतच होते. माजी खासदार नीलेश यांच्यासोबत तर त्यांचे काही व्यावसायिक कारणांवरून खटके उडाल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांनी महिनाभरापासून स्वगृही परतण्याची तयारी सुरू केली. मातोश्रीवरून त्यास हिरवा कंदील मिळत नव्हता. एकनाथ िशदे यांचा अडथळाही होताच. मात्र, फाटकांच्या प्रवेशामुळे महापालिकेतील सत्ता समीकरणे अधिक घट्ट होतील आणि महापौर निवडणुकीत होणारा खर्चही वाचेल हे ओळखून एकनाथ िशदे यांनीही त्यास अनुकूलता दर्शवली. तरीही फाटकांना प्रवेश देण्यास मातोश्रीवर फारसे अनुकूल वातावरण नव्हते.
मात्र शुक्रवारी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली आणि राणे यांना धक्का देण्यासाठी काही तासांतच फाटकांच्या प्रवेशाला मातोश्रीने हिरवा कंदील दाखविताच आपल्या कडव्या विरोधकाला शिवसेनेच्या फाटकापर्यंत पोहोचविण्याची वेळ िशदे यांच्यावर आल्याची चर्चा
आहे.
खासदार राजन विचारे आणि फाटक यांचा दोस्ताना तसा जुना आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत फाटक विचारेंना फार त्रास देणार नाहीत, असा कयास बांधण्यात येत होता. तरीही महत्त्वाकांक्षी असलेल्या फाटकांनी संजीव नाईक यांच्या प्रचारात अक्षरश: जीव ओतला. मात्र कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात शिवसेनेला ६९ हजारांचे मताधिक्य मिळाले. तेथेच फाटकांचे अवसान गळाले.