* ‘चरित्र, अनुवाद, व्यवस्थापन, व्यक्तिमत्त्व विकास हे तरुणाईच्या आवडीचे विषय!
* इंग्रजीसह मराठी पुस्तकांचेही वाचन
* ‘पुलं’, ‘वपु’ यांना आजही मागणी

स्मार्ट भ्रमणध्वनी, माहिती-तंत्रज्ञानाचे महाजाल आणि ई-बुकच्या आक्रमणातही तरुणाईमधील वाचनाची आवड कमी झालेली नाही. आजची तरुण पिढीही ‘वाचत’ असून चरित्र, अनुवाद, व्यवस्थापन, व्यक्तिमत्त्व विकास, करिअर यासह अध्यात्म, ज्योतिषविषयक पुस्तके हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. तरुण पिढीची छापील पुस्तकांना आजही पसंती असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दादर सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल अश्विनी फाटक यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले, आमच्या ग्रंथालयाचे ३ हजार ८०० सभासद असून यातील २५ ते ३० टक्के सभासद हे तरुण पिढीचे आहेत. या वाचकांकडून चेतन भगत, अमिश त्रिपाठी यांच्या पुस्तकांना विशेष मागणी असतेच, पण अध्यात्म, ज्योतिष या विषयांवरील पुस्तकेही ही पिढी आवडीने वाचते. चरित्र, आत्मचरित्र, अनुवादित या विषयांवरील पुस्तकांना जास्त मागणी आहे. अनुवादित पुस्तकांमध्ये देशी आणि विदेशी अशा दोन्ही लेखकांचा समावेश आहे. पन्नास किंवा त्यापुढील वयोगटाचा जो वाचक आहे, त्यांचा कथा, कादंबरी आणि ललित साहित्य वाचण्याकडे जास्त कल दिसून येतो.
डोंबिवलीतील ‘मॅजेस्टिक बुक हाऊस’चे सुरेश मोरजकर यांनी सांगितले, इंग्रजी माध्यमातून शिकलेले विद्यार्थी जे आता नोकरी/व्यवसाय करत आहेत त्यांच्याकडून चेतन भगत, सुदीप नगरकर, अमिश पटेल यांची इंग्रजी पुस्तके खरेदी केली जातात. तरुण पिढीकडून चरित्र, व्यक्तिमत्त्व विकास, ऐतिहासिक, भटकंती, गड-किल्ले, करिअर आणि ज्योतिष व आध्यात्मिक विषयांवरील पुस्तके जास्त खरेदी केली जातात. मराठीतील ‘छावा’, ‘मृत्युंजय’, ‘पानिपत’, ‘संभाजी’ या ऐतिहासिक पुस्तकांची मागणी कायम असून ‘पुलं’,‘वपु’ हे आजही लोकप्रिय आहेत.लोकमान्य सेवा संघाच्या श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालयाच्या ग्रंथपाल मंजिरी वैद्य यांनी आत्ताची तरुण पिढीही छापील पुस्तके वाचत असून ही समाधान व आनंद देणारी बाब असल्याचे सांगितले. २० ते ३५ या वयोगटातील सभासद असलेल्या वाचकांकडून ताज्या घडामोडींवरील पुस्तके विशेषत्वाने वाचली जातात. ‘२६/११’च्या निमित्ताने या विषयाशी संबंधित पुस्तके जास्त प्रमाणात वाचली गेली. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या ‘टाटायन’ या पुस्तकाला नुकताच पुरस्कार मिळाला. त्यामुळे अनेक वाचकांनी या पुस्तकासाठी आपली मागणी नोंदवून ठेवली आहे. अच्युत गोडबोले यांच्या ‘मुसाफिर’, ‘अर्थात’ या पुस्तकांनाही चांगली मागणी आहे. अनुवादित आणि चरित्रात्मक पुस्तके (इंग्रजी आणि मराठीही) वाचण्याकडे तरुणाईचा कल आहे, तर पन्नाशीपुढील वाचकांचा भर हा विशेष करून विविध विषयांवरील मराठी पुस्तकांवरच असल्याचे दिसून येते. आमच्या ग्रंथसंग्रहालयाचे ८ हजार सभासद असून यात पन्नाशीपुढील सुमारे साठ टक्के, तर २० ते ३० या वयोगटातील सुमारे ४० टक्के सभासद आहेत. ‘वाचाल तर वाचाल’ हे सूत्र आजच्या आणि भावी पिढीलाही पटले असून वाचनसंस्कृती कमी झालेली नाही, त्यामुळे ती लोप पावण्याची भीती निराधार असल्याचे निरीक्षण या सगळ्यांनी नोंदविले.

चर्चेतल्या विषयांना मागणी
जो विषय किंवा व्यक्ती चर्चेत आहे त्या विषयांवरील पुस्तकांना मागणी वाढते असे पाहायला मिळते. सध्या संजय लीला भन्साळी याच्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील ‘पिंगा’ गाण्याचा वाद सुरू आहे. त्यामुळे बाजीराव पेशवे, मस्तानी आणि एकूणच पेशवे घराण्यावर असलेल्या पुस्तकांची चौकशी वाचकांकडून केली जात आहे. असा एखादा विषय चर्चेत आला, की किमान दोन ते तीन महिने त्या विषयाशी संबंधित पुस्तकांना जास्त मागणी असते.

माहितीपर आवडते
‘हॅरी पॉर्टर’पासून वाचनाची सुरुवात झाली. इंग्रजी माध्यमात शिक्षण झाल्यामुळे इंग्रजी कथा, कादंबरी जास्त वाचते. सिडनी शेल्डन आवडता लेखक आहे. भारतीयांमध्ये ‘विंग्स ऑफ फायर’, सुधा मूर्ती यांची अनेक पुस्तके वाचली आहेत. माहितीपर पुस्तके वाचणे आवडते. घरात हिटलर, महायुद्धावरील पुस्तकांचा संग्रह आहे. तरी रामायण, महाभारत या पौराणिक ग्रंथांचे वाचनही आवर्जून केले आहे.
– शुभदा गायकवाड, रुईया

पौराणिक कथांविषयी कुतूहल
देवदत्त पटनाईक यांची पौराणिक पुस्तके वाचतो आहे. त्यांच्या पुस्तकांमुळे दोन्ही दृष्टिकोनांतून विचार करता येतो. माहितीपर वाचणे आवडते. वेगवेगळ्या धर्माची व जातीची माहिती देणारी पुस्तके वाचून-समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. आनंद देणाऱ्या पुस्तकांपेक्षा विचार करायला लावणारी पुस्तके आवडतात. ‘ऑडिओ बुक ’वर पुस्तके वाचणे सोयीचे असते, पण तरी पुस्तके हातात घेऊन वाचण्यात मजा येते.
– केदार केळकर, रुपारेल

विषय महत्त्वाचा
पु.शि.रेगे, आनंद विंगकर यांचे साहित्य वाचले आहे. ‘ललित’मध्ये इंदिरा संत वाचायला आवडतात. ‘कविता शतकांची’मधून विविध कवींच्या कविता वाचायला मिळाल्या. लेखक बघून वाचत नाही तर विषय पाहून ठरवतो. नवनवीन लेखकांची वेगळी बाजू मांडणारी पुस्तके आवडतात. देशातील वातावरण समजून घेण्यासाठी दहशतवाद, धर्मवादावर वाचतो आहे. सुरुवात ‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम’ने केली आहे.
– वैभव मोरे, रूपारेल

पुस्तकांमुळे मत बनते
विभावरी शिरूरकरांचे ‘कळ्यांचे निश्वास’, मेघना पेठेंचे ‘नातिचारामि’, कविता महाजन यांचे लेखन, स्त्रीवादी साहित्याचे संकलित ‘तिची कथा’ आवडतात. ‘द सेकंड सेक्स’मधून बाईपणाच्या प्रवासाची बरीच माहिती मिळाली. सामाजिक विषयांवरील प्रकाशवाटा, समीधा ही पुस्तके ऊर्जा देतात. कादंबरीपेक्षा कथासंग्रह आवडतात. चर्चेतील विषयावरील पुस्तके वाचून काढते. विषय समजण्याबरोबरच पुस्तकांमुळे मत तयार व्हायला मदत होते.
– श्रद्धा भालेराव, एस.एन.डी.टी.