स्मार्टफोन, टॅबलेटमुळे संपूर्ण जगच दोन अंगठय़ांच्या तालांवर नाचू लागले आहे; पण ‘वाचन संस्कृती’ जोपासण्यात अजून तरी या ‘स्मार्ट’ कळफलकाने योहान गुटेनबेर्कने १५व्या शतकात जन्माला घालेल्या ग्रंथांच्या ‘घराणेशाही’ला धक्का लावलेला नाही. पुस्तके अजूनही घरातल्या, ग्रंथालयातल्या कपाटांमध्ये आपले नादावणारे अस्तित्व टिकवून आहेत. त्यातून वाचनाने ‘वाचू’ शकतो, हे आजकालच्या व्यवहारी तरुण पिढीलाही न समजेल तरच नवल! ज्ञान, माहितीच नव्हे, तर भाषासमृद्धी, आत्मभान अशा किती तरी स्तरांवर असलेली ‘वाचना’ची उपयुक्तता तरुणांनाही उमगली आहे. त्यामुळे आता बदल झालाय तो केवळ लेखकांच्या नावांत, कारण, पुलं, वपु, वुडहाऊस यांच्याबरोबरच देवदत्त पटनाईक, अमिश त्रिपाठी यांच्यासारख्या नवोदित लेखकांचीही भुरळ तरुण पिढीला पडू लागली आहे. आजकालच्या या वाचनसंस्कृतीचा घेतलेला हा धांडोळा..
प्रतिनिधी, मुंबई
‘वाचाल, तर वाचाल’, ही म्हण आजच्या काळातही सार्थ ठरत असताना वाचण्याची माध्यमे आजही बदलली नसल्याचे मायाजालावरील पुस्तक खरेदीवर नजर टाकल्यास अगदी सहज समजू शकते. विविध विक्रय संकेतस्थळांवरून होणाऱ्या पुस्तक खरेदीवर नजर टाकली असता आजही ई-बुक्सच्या पर्यायापेक्षा लोक छापील पुस्तकांनाच पसंती देत असल्याचे स्पष्ट होते. मात्र ‘किंडल’वर पुस्तक वाचणारे लोक आवर्जून पुस्तकांची किंडल आवृत्ती घेत असल्याचे दिसते. विशेष म्हणजे ऑनलाइन खरेदीमध्येही प्रचंड खपाच्या लोकप्रिय पुस्तकांनाच पसंती दिली जाते.
ऑनलाइन पुस्तक खरेदीचा कल तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्यातही स्मार्टफोनवर पुस्तके वाचण्यासाठी विविध अ‍ॅप्स उपलब्ध झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात या अ‍ॅपवरूनही पुस्तके वाचण्याचा पर्याय तरुणाईने निवडला. त्यासाठी अल्डिको, फ्लिपकार्ट ई-बुक रीडर, अ‍ॅमेझॉन किंडल, गुगल प्ले बुक्स आदी अ‍ॅप्सना तरुणाई पसंती देते. मात्र अधिक माहिती घेतली असता या अ‍ॅप्सवर मोफत उपलब्ध पुस्तके वाचणाऱ्यांची संख्या जास्त आहे. लोकप्रिय पुस्तके अ‍ॅपवर ई-बुकच्या माध्यमातून वाचण्याऐवजी अजूनही त्यांच्या छापील प्रतींनाच मागणी आहे.
‘किंडल’वर पुस्तक वाचणारे वाचक मात्र आवर्जून पुस्तकांची किंडल आवृत्ती खरेदी करतात. अशा वाचकांची संख्या कमी असल्याने ई-बुक्सचा खपही खूप कमी आहे. छापील पुस्तकापेक्षा किंडल आवृत्ती खूपच स्वस्त असते.
त्याचप्रमाणे अनेक आंतरराष्ट्रीय प्रकाशनगृहांची पुस्तके सहज उपलब्ध होतात. या पुस्तकांची छापील किंमत हजारांच्या घरात असताना अनेक पुस्तकांची किंडल आवृत्ती ३०० ते ४०० रुपयांत उपलब्ध असल्याने ते सोयीचे पडते. ही पुस्तके प्रत्यक्ष स्वत:जवळ बाळगावी लागत नसल्याने कोठेही उभे राहून ‘किंडल’वर ती वाचणे अगदीच आरामदायक असते, असे ‘किंडल’वर नेमाने पुस्तके वाचणाऱ्या नीलेश अग्निहोत्री यांनी स्पष्ट केले.

भारतीय लेखकांना पसंती
ऑनलाइन पुस्तकांमध्ये भारतीय लेखकांची इंग्रजी पुस्तके सध्या प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यात ‘शिवा ट्रायालॉजी’, ‘सियॉन ऑफ इश्वाकू’, डॅन ब्राउन, अगाथा ख्रिस्ती यांची पुस्तके यांना जास्त मागणी आहे. वर्गवारीनुसार आत्मचरित्रे, काल्पनिक पुस्तके, रहस्यात्मक पुस्तके लोकप्रिय असल्याचे दिसते. या पुस्तकांच्या छापील प्रतींवर किमान १० ते कमाल ६० टक्के सवलत असल्याने अनेक जण या विक्रय संकेतस्थळांवरून पुस्तके विकत घेण्यासाठी प्राधान्य देत आहेत. तसेच ई-बुक्समध्ये मराठी किंवा बहुभाषिक पुस्तकांचा समावेश नसल्यानेही वाचक ई-बुक्सकडे पाठ फिरवतात.