‘ग्रंथगौरव’ पुरस्कार सोहळ्यात यशवंत देवस्थळी यांचे गौरवोद्गार
‘टाटायन’ हे राजकारण, समाजकारण, कामगारांच्या प्रश्नांबरोबरच अनेक हृद्य व्यक्तिरेखांनीही समृद्ध आहे. त्यामुळे त्याकडे केवळ कारखानदारी आणि उद्योग या विषयावरील पुस्तक म्हणून पाहू नये, अशा शब्दांत ‘एल अँड टी’चे यशवंत देवस्थळी यांनी ‘टाटायन’ या गिरीश कुबेर लिखित पुस्तकाचे मर्म उलगडून दाखविले.
विलेपाल्रेतील उत्कर्ष मंडळ संस्थेचा गंथगौरव पुरस्कार ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या ‘टाटायन’ला देण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळ्यात देवस्थळी बोलत होते. लेखकाला रोख दहा हजार आणि प्रकाशकांना पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
‘मराठी समाजाने उद्यमशील असले पाहिजे. आणि उद्योगधंद्यातले बारकावे समजण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल,’ असे प्रतिपादन देवस्थळी यांनी यावेळी केले. देशप्रेम आणि उत्तम व्यावसायिकता ही मूल्ये टाटा समूहाची परंपरा असल्याचे सांगून देवस्थळी यांनी टाटांच्या चार पिढय़ांचे कौतुक केले. ‘कुटुंबाकडे उद्योगाची सर्व मालकी असूनही त्यांनी श्रेष्ठ व्यावसायिक मूल्यांचे काटेकोरपणे पालन केले. पिढीजात व्यावसाय करणाऱ्या कुटुंबांविषयी भारतात अनेक गरसमज आहेत. ‘टाटायन’मुळे त्यांचे निरसन झाले आहे, असे सांगून देवस्थळी यांनी पुस्तकाच्या मलपृष्ठावरचा मजकूर मुद्दाम वाचून दाखवला. गिरीश कुबेर यांनी यावेळी बोलताना मराठी माणसाच्या वृत्तीवर कोरडे ओढले. ‘‘संपत्तीनिर्मिती ही वाईट गोष्ट आहे’ हा चुकीचा दृष्टिकोन मराठी समाजाने ठेवू नये. गरिबीचे फाजील उदात्तीकरण केल्यामुळे मराठी समाज धनिक वर्गाकडे संशयाने पाहतो. यामुळे ‘बरे चालले आहे’ असे सांगायलाही तो तयार नसतो. एखाद्याने जर चुकून असे म्हटलेच तर ‘नको ते धंदे’ करत असणार म्हणून त्याकडे संशयाने पाहिले जाते,’ असे ते म्हणाले. संपत्ती नेहमी वाममार्गानेच मिळवली जाते, हा समज चुकीचा आहे. ती एक प्रदीर्घ प्रक्रिया असून तिच्यामुळे समाजव्यवस्था मार्गी लागते आणि पुढे जाते. या प्रक्रियेला भिडण्याची, समजण्याची आणि आत्मसात करण्याची वृत्ती युवा पिढीकडे आहे. हल्ली अनेक घरांतून मुलांच्या उधळपट्टीविषयी तक्रार केली जाते. मला मात्र यात संपत्तीनिर्मितीची बीजे दिसतात, असे निरीक्षण त्यांनी यावेळी नोंदवले.
टाटा समूहाची औद्योगिक वाटचाल मराठी समाजापुढे आणणे ही बाब सामाजिकदृष्टय़ा महत्त्वाची आहे. याशिवाय संपत्तीनिर्मितीतील सात्त्विकता हा महत्त्वाचा मुद्दा मराठी माणसाला प्रेरणादायी ठरेल, असे पुरस्कार निवड समितीच्या वतीने अर्थतज्ज्ञ डॉ. चंद्रहास देशपांडे व अ‍ॅड. किशोर जावळे यांनी सांगितले. डॉ. चारुशीला ओक, लेखिका माधवी कुंटे, डॉ. विवेक भट, राजहंस प्रकाशनच्या विनया खडपेकर, भगवान दातार, संपादक अरुण शेवते आणि अभिनेता सचिन खेडेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका गोडबोले यांनी केले, तर कार्यक्रमाची सांगता चित्रा वाघ यांच्या पसायदानाने झाली.