‘आर्टिस्ट्स सेंटर’ हे संस्थाचालित कलादालन मोक्याच्या जागी असूनही ‘जहांगीर आर्ट गॅलरी’च्या तुलनेनं तसं दुर्लक्षित. ‘जहांगीर’पासून जवळच, लायन गेटकडे जाणाऱ्या रस्त्यावर ‘अडोर हाउस’ नावाच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर असलेलं हे लहानसं दालन फार कमी वेळा गजबलेलं दिसतं. ‘पोस्ट-एज’ हे इथलं नवं प्रदर्शन मात्र याला अपवाद ठरतं आहे. या प्रदर्शनाला लोकांचा प्रतिसादही मिळतो आहे.. याचं एक अगदी साधं कारण म्हणजे, तब्बल दीडशे चित्रकारांचा सहभाग या प्रदर्शनात आहे.. ही सर्व चित्रं पोस्टकार्डावर आहेत!

दिलीप रानडे, अंजना मेहरा, माधव इमारते, मीरा देवीदयाळ अशा मुंबईतल्या महत्त्वाच्या (आता ज्येष्ठही) चित्रकारांचा समावेश प्रदर्शनात आहे, तसाच युसुफ (भोपाळ), पांडुरंग ताठे (पुणे) यांसारख्यांचाही आहे आणि त्यांच्या पुढल्या पिढीच्या – यशवंत देशमुख, विशाखा आपटे, संजीव सोनपिंपरे, राजेन्द्र कापसे, महेंद्र दामले, रत्नदीप अडिवरेकर आदी- चित्रकारांचाही आहे. त्याहीनंतरचे राहुल वजाळे, मीनल दमाणी, प्राजक्ता पालव इथे आहेत; सतीश वावरे, संजय सावंत, नितीन दादरावाला हे सुमारे २१ वर्षांपूर्वीच्या ‘सृजन’ या अमूर्त-चित्रकारांच्या समूहातले चित्रकार आहेत. या अमूर्तकारांना समांतर प्रवास करणारे पंडित खरनार यांचं नवं काम इथे पाहायला मिळतं. भारती पित्रे (सिरॅमिक-शिल्पकार), मेधा सत्पाळकर, तनुजा राणे (दोघीही मुद्राचित्रकार) यांची पोस्टकार्ड-चित्रं आहेत. जयदीप मेहरोत्रा, ब्रिंदा मिलर, पापरी बोस, काहिनी आर्ते-र्मचट ही इंग्रजी वृत्तपत्रांना अधिक प्रिय असणारी नावंदेखील इथं आहेत.

पोस्टकार्ड हा उघडपणे, निर्भीडपणे अभिव्यक्त होऊन संवाद साधण्याचा मार्ग होता.. त्याची जागा आता मोबाइलनं घेतली आणि कुणीतरी तुमचे संदेश पाहण्याचा-त्यावर कुणाचीतरी पाळत असण्याचा धोका उलट साध्या उघडय़ावाघडय़ा पोस्टकार्डापेक्षा मोबाइलवरच अधिक वाढला. पोस्टकार्ड नावाची वस्तू अनेकांच्या लेखी जवळपास इतिहासजमाच झाली..  पण हृद्गत मांडण्याचं हे साधन आजही विकत मिळतं. त्याचा वापर का नाही करायचा पुन्हा? अशा काहीशा भूमिकेतून या प्रदर्शनाची कल्पना पुढे आली. तिला प्रतिसाद भरघोस मिळाला, हे तर दिसतंच आहे. यातून पोस्टकार्डावर चित्रकार काय काय करू शकतो, याच्या दीडशे शक्यता पुढे आल्या!

फिलिप डिमेलो वसईचे. त्यांच्या चित्रांत म्हैस हा आकार आधीपासूनच दिसायचा. पण तो आला कुठून? याचं उत्तर ‘घरच्याच गोठय़ातून’ हे आहे, असं इथं कळतं. म्हैस वाचवू शकलो नाही, याची खंत व्यक्त करणारा पत्रासारखा मजकूरही या चित्रात-चित्रावर आहे. आणखीही काहीजणांनी मजकुराचा थोडाफार वापर केला आहे. सूर्यकांत लोखंडे यांनी पाटीवर पोस्टकार्ड आणि त्यावर थेट प्रेक्षकांकडे रोखलेलं (त्रिमित) बोट अशा शिल्पवजा कामातून लक्ष वेधलं आहे. इमारते हे आधीपासूनच पत्रांवर ड्रॉइंग करायचे. त्यांनी तशाच चित्रांचं अख्खं प्रदर्शनही एकदा केलं होतं. त्यांची ‘टाइपरायटर’ची जराजर्जर प्रतिमा, प्रतिमा म्हणून अजरामरच म्हणावी अशी आहे. ती इथे पाहायला मिळेल. शार्दूल कदम, राहुल वजाळे, सुचेता घोडके, तेजस्विनी सोनवणे अशा अनेकांच्या ड्रॉइंगची वैशिष्टय़ं इथे शोधता येतील. स्वीटी जोशी, अमरनाथ शर्मा, नीलेश शिलकर यांसारख्या अनेकविध चित्रकारांची व्यवच्छेदक वैशिष्टय़ंही इथं जाणून घेता येतील. बेंगळूरु, बडोदे, भोपाळ, पुणे अशा ठिकाणचे चित्रकार एकत्र एका छताखाली पाहता येतील.. या सर्व कारणांसाठी हे प्रदर्शन पाहणं आवश्यकच आहे.

‘चित्रं पाहायची सवय नाही’ ही सबबसुद्धा खरं तर, या प्रदर्शनासाठी विसरून जावी लागेल! चित्रं पाहण्याची सवय लागावी, भरपूर प्रकारची चित्रं डोळ्यासमोर यावीत, यासाठी अशी सुवर्णसंधी कुठून मिळणार?

आणि हो, या प्रदर्शन काळात १६ सप्टेंबर संध्याकाळी ५ वाजता  ‘चित्रकारांची  पत्रे’ या विषयी एक दृक्श्राव्य सादरीकरण श्री. नितीन हडप, प्रमोद काळे आणि विक्रम मराठे करणार आहेत. त्या निमित्तानं तरी नक्की भेट द्या.

आणखी एक सुवर्णसंधी

भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाल्याचं हे ७०वं वर्ष. त्या निमित्तानं प्रत्येक वर्षांसाठीची एक कलाकृती- म्हणजे त्या वर्षांतल्या घडामोडींच्या अनुषंगानं- त्या ‘मूड’ला शोभणाऱ्या किंवा थेटच घडामोडींबद्दल बोलणाऱ्या कलाकृती, अशी या प्रदर्शनाची मध्यवर्ती कल्पना आर्शिया लोखंडवाला यांनी मांडलेली आहे. इथेही तब्बल सत्तर कलाकृती आहेत! त्यातही काही व्हिडीओ-कलाकृती. म्हणजे सुमारे दीड तासाचा वेळ देऊन हे प्रदर्शन पाहावं, इतका प्रचंड ऐवज इथं आहे. एल्फिन्स्टन रोड (हेच नाव आजही आहे) स्थानकाजवळच्या ‘इंडियाबुल्स वन सेंटर’च्या टॉवर क्रमांक दोनच्या लॉबीमध्येच ‘ओडेसी गॅलरी’ ही आडमाप आकाराची गॅलरी आहे, तिथं हे प्रदर्शन भरलंय. इथली विवान सुंदरम, जस्टिन पोन्मणी, अनिता दुबे, प्रभाकर पाचपुते, मनजीत बावा अशा अनेकांची कामं नक्की पाहण्यासारखी आहेत.. पण या प्रदर्शनाबद्दल पुन्हा कधीतरी!