हिंदुत्वाबाबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या प्रखर भूमिकेतूनच हिंदुत्वाचा विचार देशात रुजला. हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरून एकत्र आलेल्या शिवसेना-भाजपला एकेकाळी जे लोक अस्पृश्य समजत होते, तेच आज सत्ता असल्याने ‘आ गले लग जा’चा कार्यक्रम करत असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तर एखादी भूमिका घेतल्यानंतर त्याच्यामागे ठामपणे उभे राहणे हे बाळासाहेबांचे वैशिष्टय़ होते, असे कें द्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.

शिवसेनाप्रमुखांच्या मुलाखतींचा दस्तावेज असलेल्या ‘एकवचनी’ या खासदार संजय राऊत यांच्या द्विखंडीय संग्रहाचे प्रकाशन रवींद्र नाटय़मंदिरात झाले. बाळासाहेब हे काळाच्या पुढे चालणारे नेते होते, असे सांगून मराठी अस्मिता व हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेने कसा लावून धरला याचे किस्से उद्धव यांनी सांगितले. तामिळनाडूत अम्मा कँटिन चालते तर आमची झुणका-भाकरही चालली पाहिजे. दक्षिणेत इडली-वडा चालतो तर आम्ही वडापावच्या माध्यमातून मराठी माणसाला मदत केली तर बिघडले कुठे, असा सवालही उद्धव यांनी केला. बाळासाहेब हे एक अद्भुत रसायन होते. एखादी भूमिका घेतली की त्यावर ते शेवटपर्यंत ठाम राहात असे अरुण जेटली म्हणाले. त्यांनी सर्व क्षेत्रात आपले संबंध निर्माण केले होते तसेच व्यंगचित्र व रोखठोक स्वभाव ही त्यांची ताकद होती, असेही त्यांनी सांगितले. बाळासाहेबांचे बोलणे हे बंदुकीच्या गोळीसारखे होते. ते जेवढे चांगले नेते होते त्यापेक्षाही ते एक उत्तम माणूस होते, असे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.