ऑलिम्पिक विजेत्या मूक बधीर तरूणावर पानाच्या दुकानात काम करण्याची वेळ

लातूरसारख्या दुष्काळी भागातून आलेल्या अन्वर शेख या मूकबधीर तरूणाने केवळ आपल्या खेळगुणांच्या बळावर २००५ साली झालेल्या ‘स्पेशल ऑलिम्पिक्स’मध्ये विजेतेपद मिळवले होते. मात्र त्यानंतर गरीबीमुळे शिक्षण सुटलेल्या अन्वरला कुठेही रोजगार मिळत नसल्याने पानाच्या दुकानात काम करून उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे. अपंग खेळाडूंच्या राखीव जागेतून नोकरी मिळावी म्हणून वणवण करून थकलेल्या अन्वरने आत्तापर्यंत मिळवलेली ५० पदके परत घ्या, पण काम द्या, असे आर्जव करत सोमवारी आझाद मैदानावर धरणे धरले होते.

जन्मत:च मूकबधीर असलेल्या अन्वर हमीदसाब शेखने आपल्या अंगभूत गुणांच्या बळावर धावणे, हॉकी, व्हॉलीबॉल, टेनिस यासारख्या वेगवेगळ्या खेळात प्राविण्य मिळवले. आई-वडिलांचे छत्र डोक्यावर नसतानाही शालेय स्तरापासून वेगवेगळ्या खेळांसाठी प्रशस्तीपत्रक  आणि पदके मिळवणाऱ्या अन्वरने २००५ साली जपानमध्ये झालेल्या ‘स्पेशल ऑलिम्पिक  वर्ल्ड विंटर गेम्स’मध्ये आणि त्याआधी झालेल्या दोन स्पेशल ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. ‘स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड विंटर गेम्स’मध्ये विजेतेपद मिळविण्याबरोबरच तो राज्यस्तरीय स्पर्धामधूनही अनेक प्रशस्तीपत्रके, पदकांचा मानकरी ठरला होता. मात्र गरीबीमुळे दहावीनंतर शिक्षण सोडावे लागलेल्या अन्वरला कुठेही काम मिळत नसल्याने पानाच्या गादीवर काम करावे लागत आहे. आझाद मैदानावर आपली सगळी प्रशस्तीपत्रके, पदके मांडून आपल्यावर झालेल्या कैफियत मांडण्याचा प्रयत्न अन्वरने केला. गेली दोन वर्ष सातत्याने अन्वरने रेल्वे बोर्डाच्या भरतीसह अनेक ठिकाणी कामासाठी धडपड केली.  त्याने पुण्यातून क्रीडा संचालनालयाकडेही अर्ज केला होता. मात्र सगळीकडून नकारघंटा वाजवण्यात आली, अशी माहिती अन्वरच्या पत्नीने दिली.

अन्वरने संगणक प्रशिक्षण पूर्ण केले आहे, टंकलेखनाचाही प्रशिक्षणक्रम त्याने पूर्ण केला आहे. गेल्यावर्षी रेल्वे भरतीसाठीची लेखी परीक्षाही त्याने दिली. काम सांभाळून अन्वरने बारावीची परीक्षाही दिली आहे.

सातत्याने धडपड करूनही केवळ नोकरीच्या बाबतीत अन्वरच्या पदरी निराशाच येत असल्याचे त्याच्या पत्नीचे म्हणणे आहे.