आझाद मैदान दंगलीतील नुकसान अवघे ३६ लाख रुपये एवढेच असल्याचा दावा राज्य सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात केला आहे. विशेष म्हणजे नुकसानाचा हा आकडा पावणेतीन कोटी रुपयांच्या घरात असल्याचा दावा सरकारने यापूर्वी प्रतिज्ञापत्राद्वारेच केला होता.
आझाद मैदान येथे झालेल्या दंगलीतील नुकसान राज्य सरकार दाखवत असलेल्या (दोन कोटी ७४ लाख रुपये) आकडय़ापेक्षा खूपच अधिक असल्याचे नमूद करीत नुकसान किती झाले यासाठी केलेल्या चौकशीवर न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत तपशीलवार आणि योग्य प्रकारे चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने चौकशी करीत त्याचा अहवाल न्यायालयात सादर केला. जिल्हाधिकारी शैला ए यांनी यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर केले असून त्यात केवळ पोलीस, पालिका, बेस्ट आणि अग्निशमन दल यांच्या मालमत्तेचेच नुकसान झाल्याचे आणि नुकसानाचा आकडा ३६ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे. शिवाय यासाठी ६० जणांना जबाबदार धरण्यात आले असून त्यांना वसुलीसाठी नोटीस बजावण्यात आल्याचेही नमूद केले आहे. यापूर्वी मात्र सरकारने सभेच्या आयोजकांना वसुलीसाठी नोटीस बजावण्यात आल्याची माहिती       दिली होती.