आकडेवारीच्या कसरती करणारा, विविध उपक्रमांना प्राधान्य देणारा आणि सुदैवाने मुंबईकर प्रवाशांच्या खिशात हात न घालणारा बेस्टचा २०१६-१७ या वर्षांसाठीचा अर्थसंकल्प महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी शुक्रवारी समितीसमोर मांडला. आकडेवारीच्या कोलांटउडय़ा मारत हा अर्थसंकल्प शिलकीचा असल्याचे दाखवण्यात आले असले, तरी ही शिलकीची रक्कम ०.०१ कोटी एवढी प्रचंड आहे. बेस्टचे सध्याचे तिकीट दर जास्त असल्याने या अर्थसंकल्पात भाडेवाढीचा समावेश न केल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

बेस्टचा परिवहन विभाग तोटय़ात चालत असूनही प्रवाशांना उत्तम सुविधा, ५० वातानुकूलित मिडी बसगाडय़ा आदी उपक्रमांना या अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासाठी पालिकेकडून मिळणाऱ्या ३५२.८८ कोटी रुपयांच्या अनुदानाचा हवालाही या अर्थसंकल्पात दिला आहे. या ५० बसगाडय़ा घेण्यासाठी तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी लागण्याचा अंदाज अर्थसंकल्पात वर्तवण्यात आला आहे. या गाडय़ा प्रचलित वातानुकूलित गाडय़ांच्या तिकीट दरांपेक्षा कमी दरांत चालवल्या जाणार आहेत. मात्र, या गाडय़ा कोणत्या कंपनीकडून विकत घेतल्या जातील, त्याबाबत काहीच निर्णय झालेला नाही; असे बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले.
त्याशिवाय आतापर्यंत मानवी हस्तक्षेपाने ठरवले जाणारे बेस्टचे मार्ग यापुढे संगणकीकरण पद्धतीने ठरवले जाणार आहेत. साधारणपणे एक कर्मचारी दिवसाला २० मार्ग करू शकत होता. मात्र यापुढे संगणकीय पद्धतीने त्यांचे वर्गीकरण होणार असल्याचेही महाव्यवस्थापक डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले. बेस्टच्या वाहतूक विभागाचे तिकीट दर सध्या किमान ८ रुपये एवढे आहेत. हे दर नक्कीच जास्त असल्याने त्यात कोणताही फेरफार करणार नसल्याचेही डॉ. पाटील यांनी सांगितले. त्याशिवाय सांताक्रूझ आणि मजास या दोन आगारांच्या पुनर्बाधणीसाठी आणि नूतनीकरणासाठी बेस्टने आपल्या अर्थसंकल्पात १०० कोटींची तरतूद केली आहे. या नूतनीकरणानंतर बेस्टला या आगारांमधूनही उत्पन्न मिळणार आहे.
बेस्टने आकडेवारीच्या खेळात परिवहन विभागाचा एकूण तोटा ६५५.५३ कोटी एवढा दाखवला असून विद्युत विभागातून मिळणारा नफा ६५५.५४ कोटी एवढा दाखवला आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प शिलकीचा ठरला असून बेस्टने या ०.०१ कोटी रुपयांच्या ‘शिलकी’बद्दल स्वत:चीच पाठ थोपटून घेतली आहे.
अर्थसंकल्पाची वैशिष्टय़े
बेस्टचा ०.०१ कोटी रुपयांचा ‘शिलकी’चा अर्थसंकल्प सादर; विविध उपक्रमांना प्राधान्य
’ बसगाडय़ा तांत्रिकदृष्टय़ा भक्कम करणे
’वीज वितरण प्रणालीत सुधारणा करणे
’ बस प्रवास आकर्षक आणि आर्थिकदृष्टय़ा किफायतशीर करणार
’‘स्मार्ट सिटी’साठी माहिती प्रणाली, मध्यवर्ती नियंत्रण कक्ष, बस स्थानके व थांबे यांवर मार्गदर्शक फलक लावणे, बसमार्गाची माहिती संकेतस्थळांवर व मोबाइलवर उपलब्ध करून देणे.
’ कर्मचाऱ्यांना दर्जेदार सुविधा देणे