* जून महिन्यात ११ लाख रुपये न भरल्याचा ठपका
* लेखा परीक्षणात लेखा विभागाची चूक झाल्याचा दावा
तोटय़ात चाललेल्या ‘बेस्ट’च्या महाव्यवस्थापकांनीच ‘बेस्ट’चे जून महिन्याचे तब्बल ११ लाख रुपयांचे वीजबिल थकवल्याची बाब समोर आली आहे. मात्र लेखा परीक्षणात उघड झालेली ही गोष्ट म्हणजे बेस्टच्या लेखा विभागाची एक चूक असल्याचे स्पष्टीकरण बेस्ट प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. लेखा विभागाने ११ लाखांची नोंद या खात्यावर केली नसल्याने, जून महिन्याचे बिल थकीत असल्याचे दाखवले जात आहे, असे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले.
बेस्टच्या विद्युत विभागातील ग्राहकांकडून वीजबिल थकवण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. यात काही सरकारी आस्थापनांबरोबरच खासगी ग्राहकांचाही समावेश आहे. या थकीत वीजबिलांचा आकडा साधारण ६० ते ७० कोटींपेक्षा जास्त असल्याचे ‘बेस्ट’ समिती सदस्य रवी राजा यांनी निदर्शनास आणले होते. त्याचप्रमाणे वीजबिल थकवणाऱ्या ग्राहकांत मंत्रालयापासून विविध रुग्णालये, पोलीस आयुक्तालय यांचाही समावेश असल्याचे त्यांनी दाखवून दिले.
या सर्वावर कुरघोडी करत बेस्टच्या महाव्यवस्थापकांच्या नावावर असलेल्या मीटरचे तब्बल ११ लाख रुपयांचे वीजबिल भरलेच गेले नसल्याची माहिती रवी राजा यांनी बेस्ट समितीसमोर मांडली. महापालिकेच्या लेखा परीक्षणात जून महिन्यात बेस्टच्या महाव्यवस्थापकांच्या नावावर ही रक्कम थकीत दाखवण्यात आली आहे. या रकमेची नोंद बेस्टच्या लेखा विभागाने केली होती का, असा प्रश्नही या लेखा परीक्षणात विचारण्यात आला आहे.
या परीक्षणानुसार ११००६००७७ या महाव्यवस्थापकांच्या नावे असलेल्या खाते क्रमांकावर जून महिन्यात १० लाख ७० हजार एवढी रक्कम भरणे बाकी असल्याचे म्हटले आहे. तर २०००००२९४ या खाते क्रमांकावर ५६७२० रुपये थकीत असल्याचे म्हटले आहे. ही एकूण रक्कम ११ लाख २९ हजार ६८० रुपये एवढी आहे. मात्र, याबाबत बेस्ट प्रशासनाला विचारले असता ही रक्कम थकीत नसून बेस्टच्या लेखा विभागाच्या चुकीमुळे ती थकीत असल्याचे दिसत आहे, असे स्पष्टीकरण देण्यात आले. बेस्टच्या अंतर्गत व्यवस्थेतून हा वीजबिल भरणा होत असतो. त्याची नोंद संबंधित खात्यावर करायची असते. मात्र लेखा विभागाने ती नोंद न केल्याने ही रक्कम थकीत असल्याचे दिसत आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले.