प्रभावी नेतृत्वाअभावी सत्तेत असूनही सेनेची कोंडी अधिक

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान न मिळाल्याने शिवसेनेने नाराजी व्यक्त करताना भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी मृतप्रत झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. केंद्र व राज्याच्या सत्तेत असूनही शिवसेनेची अवस्था ‘सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही’ अशी झाली आहे. आधीच्या सरकारमध्ये सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने ज्या पद्धतीने पाठिंब्याची पुरेपूर किंमत वसूल केली होती त्या तुलनेत शिवसेनेची कोंडीच अधिक झाली आहे.

भाजपने कुरघोडी करायची आणि शिवसेनेने इशारे द्यायचे हे असेच ‘रडतराऊत’ सध्या सुरू आहे. भाजपने शिवसेनेचे पाणी चाखले आहे. शिवसेना कोणत्या थरापर्यंत जाऊ शकते, याचा भाजपला पूर्ण अंदाज आहे. शिवसेना नेत्यांनी कितीही टोकाची भूमिका मांडली तरी शिवसेना सत्तेतून बाहेर पडत नाही. शिवसेनेच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करीत भाजपने आपली ताकद अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. अप्रत्यक्षपणे भाजप शिवसेनेला फार काही किंमत देत नाही, असेच चित्र आहे.

भाजपला शिवसेना संपवून आपला विस्तार करायचा आहे. भाजपचे सध्या तेच ध्येय आहे. काँग्रेसलाही राष्ट्रवादीला संपवायचे होते. कारण राष्ट्रवादी कमकुवत झाल्याशिवाय राज्यात काँग्रेस वाढणार नाही हे गणित होते. भाजप किंवा काँग्रेसचा कार्यक्रम मित्र पक्षांना संपविण्याचाच होता. भाजपने शिवसेनेची पार कोंडी केली आहे. शिवसेनेच्या अनेक आमदारांना भाजपमध्ये जाण्याचे वेध लागले आहेत. शिवसेनेत राहून भवितव्य नाही, अशी ग्रामीण भागातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये भावना वाढू लागली आहे. काँगेसने अशाच पद्धतीने राष्ट्रवादीला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला होता. पण राष्ट्रवादीच्या मागे सहकार चळवळीची भरभक्कम बांधणी होती. सहकार क्षेत्रावर राष्ट्रवादीचा पगडा होता. शिवसेनेच्या मागे तशी ताकद नाही. मुंबई, ठाण्यातील मराठी माणसांना अजूनही शिवसेनेचे आकर्षण आहे. पण केवळ मराठी मतांवर विजयाचे गणित यापुढील काळात जुळू शकणार नाही हे मुंबई, मीरा-भाईंदरच्या निकालाने स्पष्ट केले आहे.

काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी किंवा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा मानसन्मान ठेवत. त्यांच्या कलाने निर्णय घेत. भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा हे शिवसेनेला अजिबात किंमत देत नाहीत. २०१३ मध्ये मोदी यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे आले तेव्हा त्यांनी देशभर विविध सभा घेतल्या होत्या. मुंबईत झालेल्या सभेत मोदी यांनी युती असताना शिवसेनेचा साधा उल्लेखही केला नव्हता. भाजप आणि शिवसेनेची मतपेढी एकच आहे. अशा वेळी शिवसेनेला जास्त भाव दिल्यास आपला विस्तार होणार नाही हे भाजपचे गणित आहे. यामुळेच शिवसेनेचा तेवढय़ापुरताच वापर करायचा आणि जास्त भाव द्यायचा नाही, असे भाजपचे धोरण आहे. काँग्रेसच्या राजकारणाचा अंदाज आल्यावर शरद पवार यांनी काँग्रेसला वाकविण्यासाठी विविध खेळ्या केल्या होत्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मात्र पवारांच्या तुलनेत तेवढे तयार गडी नाहीत. यामुळेच भाजपच्या दादागिरीपुढे शिवसेनेला पडते घ्यावे लागते. भाजपशी युती करून शिवसेनेची २५ वर्षे वाया गेली किंवा यापुढे भाजपशी कदापि युती नाही, अशी वाघाची डरकाळी उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर फोडली. पुढे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मोदी आणि शहा यांनी आयोजित केलेल्या बैठकीत मोदी आणि शहा यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. काँग्रेस नेत्यांना कशा पद्धतीने हाताळायचे हे शरद पवार यांना ठाऊक होते. शिवसेनेचे नेतृत्व या तुलनेत कमी पडते. काँग्रेसला शह देण्याकरिता राष्ट्रवादीचे नेते उघड उघडपणे तेव्हा विरोधात असलेल्या भाजप वा शिवसेनेची मदत घेत. शिवसेना सत्तेत पण आहे, पण त्याच वेळी भाजपला विरोधही करते.

सेनेत आक्रमकतेचा अभाव..

काँग्रेसच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची दादागिरी चालायची. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आपल्या खात्यांमध्ये मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेपही सहन होत नसे. शिवसेनेच्या मंत्र्यांना फार काही मुक्त वावच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला नाही. उद्योग खात्याचे अनेक निर्णय परस्पर मुख्यमंत्री कार्यालयाने घेतल्याचे चित्र यापूर्वी समोर आले आहे. एखाद्या विषयावर वेगळी भूमिका असल्यास राष्ट्रवादीचे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये प्रस्ताव हाणून पाडत. शिवसेनेच्या मंत्र्यांना तेवढेही जमत नाही किंवा त्यांच्याकडून आक्रमक भूमिकाही घेतली जात नाही. शिवसेना इशाऱ्यापलीकडे फार काही ताणून धरू शकत नाही हे भाजप नेत्यांनी ओळखल्याने शिवसेनेने कितीही आदळआपट केली तरीही आपल्याला हवे तसेच करण्याची भाजपची रणनीती आहे.

पवारांचा दिल्लीतील प्रभाव

भाजपने शिवसेनेची पुरती दमछाक केली आहे. काँग्रेस आघाडीचे सरकार असताना १५ वर्षे राष्ट्रवादीचा पाठिंबा होता. राष्ट्रवादीने शिवसेनेसारखे फार काही इशारे क्वचितच दिले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना काँग्रेसचे दिल्लीतील नेतृत्व दबून होते. यामुळेच महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी कितीही राष्ट्रवादीची कोंडी करण्याचा प्रयत्न केला तरीही दिल्लीहून पवारांनी सूत्रे हलविल्यावर राज्यातील नेत्यांचा नाइलाज व्हायचा. विलासराव देशमुख यांनी एन्रॉनवरून पवारांना अडचणीत आणण्याची केलेली खेळी फसली होती. पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीला लगाम लावला, पण त्यांचाही अनेकदा नाइलाज झाला.