मुस्लीम समाजातील तरुणांनी दहशतवादी किंवा गुन्हेगारी कारवायांकडे न वळता मुख्य प्रवाहात सामील व्हावे, यासाठी राज्य सरकारने पावले टाकायला सुरुवात केली आहे. मात्र केवळ मुस्लीम तरुण दहशतवादी किंवा गुन्हेगारी कारवायांकडे वळतात, या भूमिकेला अल्पसंख्याक विभागाने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे सर्वच तरुणांना गुन्ह्य़ांपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे उद्दिष्ट ठरवून मुख्यत्वे मुस्लीम समाजावर लक्ष केंद्रित करण्याची भूमिका ठरविण्यात आली आहे. केंद्र व राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारबद्दल मुस्लिमांमध्ये अढी न राहता सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे, यावर भर दिला जाणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले. देशात आणि जागतिक पातळीवरही दहशतवादी कारवायांमध्ये मुस्लीमधर्मीय सामील असल्याचे दिसून येत असल्याने अधिक काळजीपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी गृह विभागाकडे सूत्रे देण्यात आली असून नगरविकास, शालेय शिक्षण व उच्चशिक्षण, महिला व बालकल्याण आणि अल्पसंख्याक विभाग यांच्यामार्फत विविध पातळ्यांवर पावले टाकण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी या संदर्भात संबंधितांची बैठक घेऊन काही सूचनाही केल्या होत्या.
मुस्लीम समाजातील तरुणांना मदरशांमधून धार्मिक शिक्षण दिले जात असले तरी त्यांनी पारंपरिक शिक्षण घ्यावे. मुख्य प्रवाहात सामील व्हावे, गुन्हेगारीकडे वळू नये, असे सरकारचे प्रयत्न आहेत, अशी माहिती अल्पसंख्याक विभागाचे मंत्री एकनाथ खडसे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. मालेगाव, मिरज, भिवंडी आदी ठिकाणी मुस्लीमबहुल वस्त्यांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे व अन्य सेवासुविधा पुरविण्याचे नियोजन आहे. शिक्षण, रोजगार, आरोग्य आदी माध्यमांतून विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने आता पावले टाकण्यास सुरुवात केली आहे व पुढील काळात त्यास आणखी गती देण्यात येणार आहे.

सरकारच्या उपाययोजना
’ राज्यभरात मुस्लीमबहुल विभाग व वस्त्यांमध्ये प्राथमिक सेवासुविधा
’ शालेय शिक्षण व उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची गळती कमी करणार
’ प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका स्तरावरील रुग्णालयांमध्ये महिला डॉक्टर
’मुस्लीम मुलींसाठी वसतिगृहे, शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्त्या