भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेची रणनीती

सेवा उपयोगिता कंपन्या, पालिकेचे विविध विभाग आणि बेस्ट यांना पावसाळ्यात रस्त्यावर खोदकाम करण्यास मनाई असताना मेट्रो रेल्वेसाठी मात्र मुंबईत मोठय़ा प्रमाणावर खोदकाम सुरू असून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबईत सुरू असलेले मेट्रोचे खोदकाम तात्काळ बंद करावे, अशी मागणी करीत शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मेट्रोच्या खड्डय़ांमुळे नागरिकांचा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी पालिका आयुक्तांनी घ्यावी, असा पवित्रा शिवसेनेने घेतला आहे.

मुंबईमध्ये चर खोदून कामे करण्यास सेवा उपयोगिता कंपन्या, महानगर गॅस, एमटीएनएल, बेस्टला पालिकेकडून परवानगी देण्यात येते. इतकेच नव्हे तर पालिकेच्या काही विभागांना कामांसाठी रस्ता खोदण्याकरिता पालिका प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागते. मात्र पावसाळा सुरू होण्यापूर्वी खोदलेले रस्ते पूर्ववत करण्याचे बंधन या सर्वावर घालण्यात येते. यंदा १९ मेनंतर मुंबईत खोदकाम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच यापूर्वीच परवानगी दिलेल्या कंपन्यांना पावसाळ्यानंतर रस्त्यावर खोदकाम करण्याची सूचना करण्यात आली आहे. असे असताना मेट्रोच्या कामांसाठी मुंबईत मोठय़ा प्रमाणावर खोदकाम सुरू आहे. मेट्रोसाठी मोठमोठे खड्डे खोदण्यात येत असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचत आहे. या खोदकामाभोवती बॅरिकेड उभे केले आहेत. मात्र त्याचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे पावसाळा संपेपर्यंत मेट्रोची कामे बंद करावी, अशी मागणी सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केली आहे. याबाबत आपण अजोय मेहता यांना पत्र पाठविले आहे, असेही ते म्हणाले.

शिवसेनेच्या माथी खापर का?

पालिकेची कामे निकृष्ट दर्जाची झाल्यानंतर त्याचे खापर सत्ताधारी शिवसेनेवर फोडण्यात येते; मात्र मेट्रोच्या खोदकामामुळे अपघात घडल्यास त्याची जबाबदारी पालिका आयुक्तांवर असेल, असेही यशवंत जाधव यांनी सांगितले. मेट्रो प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जात आहे. पावसाळ्यामध्ये या प्रकल्पाची कामे सुरू आहेत. ती बंद करून भाजपला शह देण्याची रणनीती शिवसेनेने अवलंबिली असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.

पावसाळ्यात खोदकामाला मनाई असताना मेट्रोला एक न्याय आणि अन्य यंत्रणांना दुसरा न्याय अशी सापत्न वागणूक का देण्यात येत आहे.  यशवंत जाधव, सभागृह नेते