मुंबईत सेनेला मदत करण्याचे पवार यांचे संकेत; दोन्ही पक्षांतील दरी वाढवण्याचे विरोधकांचे प्रयत्न

भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जवळपास समान जागा मिळाल्यानंतर, महापौरपदासाठी वेगवेगळी गणिते मांडण्याचे प्रयत्न होत असताना या दोन्ही पक्षांतील दरी आणखी वाढवून भाजपची कोंडी करण्याची रणनिती विरोधी पक्षांनी आखली आहे. मुंबईत महापौरपदासाठी भाजपला मदत करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितल्यानंतर, शिवसेनेला मात्र अप्रत्यक्षरीत्या मदत पुरवण्यात येऊ शकते, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले असून, त्यामुळे आता पुढे कुठली समीकरणे उदयास येतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी, उभय पक्षांतील वाद वाढायला नको, म्हणून राज्य मंत्रिमंडळाची उद्या, मंगळवारी होणारी बैठकच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केल्याचे कळते.

पुढील सोमवारी, ६ मार्च रोजी राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत असून, भाजप-सेनेतील दरी वाढवण्यासाठी ही वेळ उत्तम असल्याचे विरोधक मानत आहेत. महापौरपदासाठी काँग्रेस शिवसेनेस मदत करू शकते, अशी चर्चा असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ज्यांना काँग्रेसबरोबर जायचे त्यांनी जावे, अशी भूमिका मांडलेली आहे. या पाश्र्वभूमीवर, महापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहणे किंवा स्वंतत्र उमेदवार उभा करणे अशा पर्यायांवर काँग्रेस विचार करीत आहे. काँग्रेसचे ३१, तर राष्ट्रवादीचे नऊ नगरसेवक निवडून आले आहेत. हे ४० सदस्य तटस्थ राहिले, किंवा त्यांनी मिळून स्वतंत्र उमेदवार उभा केला तर त्याचा शिवसेनेला फायदा होऊ शकतो. काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष, एमआयएम अशी सगळ्यांची मिळून ४८ मते स्वतंत्र उमेदवार उभा करून एका अर्थी फुकट घालवायची म्हणजे शिवसेनेला त्याचा लाभ मिळेल, असे हे गणित आहे.

राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील मैत्रिपूर्ण संबंधांबाबत नेहमीच चर्चा होते. हा मुद्दा राष्ट्रवादीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महागात पडला आहे. कारण राष्ट्रवादीच्या विश्वासार्हतेबद्दलच त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे मुंबईत भाजपला मदत न करता शिवसेनेला अप्रत्यक्षपणे लाभ होईल, अशी भूमिका घेतल्यास भाजपबरोबरील मैत्रीच्या संबंधांचा शिक्का तरी पुसला जाईल, असे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर नेतृत्वाचे चांगले संबंध असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकीयदृष्टय़ा अधिक सक्षम होणार नाहीत याची खबरदारी राष्ट्रवादीकडून घेण्यात येणार आहे. सहकार या राष्ट्रवादीच्या बलस्थानावर फडणवीस यांनी घाव घातल्याने त्यांना धडा शिकवायचा ही राष्ट्रवादीची भूमिका असल्याचेही सांगण्यात येते. भाजपपेक्षा शिवसेनेचा महापौर मुंबईत निवडून येणे हे काँग्रेस व राष्ट्रवादीसाठी अधिक सोयीचे आहे. म्हणूनच काँग्रेसनेही शिवसेनेला मदत होईल, अशी भूमिका घेण्याचे ठरविले आहे.

वाद टाळण्यासाठी मंत्रिमंडळ बैठक रद्द

मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात निर्माण झालेल्या संघर्षांचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत उमटण्याच्या शक्यतेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्याची, मंगळवारची मंत्रिमंडळ बैठकच रद्द केल्याचे समजते. निवडणूक प्रचारादरम्यान मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारी कारभारावरून मुख्यमंत्र्यानी शिवसेनेवर टीकेची झोड उठविली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पारदर्शकतेच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करताना मंत्रिमंडळ बैठकीतही पारदर्शकता आणण्याचे आव्हान दिले होते. सध्या शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद विकोपास गेला असून कोणताही पक्ष माघार घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. अशावेळी मंत्रिमंडळ बैठकीत या वादाचे पडसाद उमटण्याची शक्यता लक्षात घेऊन ही बैठकच पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर निर्णय होतात. मात्र दोन्ही पक्षांमधील वादाचा सरकारवर परिणाम होऊ नये याची खबरदारी घेत मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलण्यात आली असून आता ही अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ५ मार्चला होईल असेही सूत्रांनी सांगितले.

‘स्थानिक नेते ठरवतील’

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी नांदेड येथे बोलताना, शिवसेनेला मदत करण्याबाबतच्या प्रश्नावर थेट ‘नाही’ असे उत्तर दिले नाही. ‘वेळ येईल तेव्हा स्थानिक नेते त्याबाबत निर्णय घेतील’, असे ते म्हणाले. पवार यांची ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.

‘अधिवेशनात सोक्षमोक्ष लावू’

शिवसेना आणि भाजपमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. राजीनामे खिशात असल्याची भाषा शिवसेनेच्या मंत्र्यांकडून केली जात आहे. या पाश्र्वभूमीवर, ‘या विषयाचा अधिवेशनात सोक्षमोक्ष लावण्याचा प्रयत्न करू’, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. ‘सरकारच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मांडण्याबाबत अद्याप पक्ष किंवा अन्य विरोधकांशी चर्चा झालेली नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले.