पाल्र्यातील चौकाला ‘अज्ञात’ महिलेचे नाव

पुलं, विजय तेंडुलकर, सतीश दुभाषी, चंद्रकांत गोखले, दत्ता भट, माधव वाटवे अशा साहित्य आणि कलाविश्वात अजरामर कामगिरी केलेल्या दिग्गजांचे वास्तव्य  राहिलेल्या विलेपाल्र्यातील एका चौकाच्या नामकरणावरून पार्लेवासियांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नेहरू रोड येथील चौकाचे सुशोभीकरण करून जानेवारीत या चौकाला कोणतेही उल्लेखनीय समाजकार्य नसलेल्या एका महिलेचे नाव देण्यासाठी पालिका व स्थानिक नगरसेविकेने पुढाकार घेतल्याने नागरिकांतून असंतोष व्यक्त होत आहे.

[jwplayer gLyhqAeU-1o30kmL6]

विलेपार्ले पूर्व येथे रेल्वे स्थानकाकडून पश्चिम द्रुतगती मार्गाच्या दिशेने जाणारा नेहरू रोडवरील पोस्ट ऑफिसजवळच्या चौकातील पाणपोई तोडण्यात आली. पाणपोई तोडल्याच्या निषेधार्थ तेथे पाणपोई चालवणाऱ्या संबंधित संस्थेने निषेधाचे फलकही लावले होते. मात्र त्याला न जुमानता सुशोभिकरण सुरू झाले. सुशोभिकरण होत असल्याने पालिका तेथे काही सुविधा देईल, असे आम्हाला वाटले मात्र प्रत्यक्षात जानेवारीत या चौकाला श्रीमती लक्ष्मीबेन भारमल छाडवा चौक असे नाव देण्यात आल्यावर मात्र आम्ही अवाक झालो. या चौकात त्यांचा अर्धपुतळाही बसवण्यात आला आहे. यांनी पार्लेकरांसाठी किंवा समाजासाठी नेमके कोणते योगदान केले, याबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही, असे जयंत देशपांडे यांनी सांगितले. जयंत देशपांडे हे पुलंचे धाकटे बंधू उमाकांत यांचे चिरंजीव आहेत.

कलासाहित्यातील नामवंत पाल्र्यात असताना अशाप्रकारे अज्ञात व्यक्तीचे नाव चौकाला देण्यात आल्याचा निषेधही स्थानिकांनी नगरसेविका ज्योती अळवणी व आमदार पराग अळवणी यांच्याकडे केला. मात्र त्यांनी पत्राला साधी पोचही दिली नाही, असे जयंत देशपांडे यांनी सांगितले.

नेहरू रोडचा हा चौक हा पार्ले येथील महत्त्वाचा भाग आहे. बाजूच्या रस्त्यावरील मोठय़ा शोरुमच्या मालकाच्या परिवारातील असलेल्या महिलेचे नाव या चौकाला देऊन चुकीचा पायंडा पाडण्यात आला आहे. विलेपार्ले येथील अनेकांनी समाजासाठी, साहित्यासाठी आयुष्यभर काम केले असताना आणि या महिलेचे समाजाला कोणतेही व्यक्तिश योगदान नसताना आणि अशा पद्धतीने केवळ पैशांच्या जोरावर नामकरण होणे अत्यंत खेदजनक आहे, असे पार्लेकर डॉ. शशी वैद्य म्हणाले. विजय तेंडुलकर, पुलंसारखी माणसे असताना केवळ संपत्तीच्या जोरावर पार्लेकरांच्या मराठी अस्मितेवर केलेला हा वार आहे. अशा प्रकारे चौकाला नामकरण करण्याआधी पार्लेकरांशी चर्चा करण्याचीही गरज स्थानिक नगरसेवकांना वाटली नाही, असे पार्ले पंचम संस्थेचे श्रीधर खानोलकर यांनी सांगितले. नेहरू चौकातील अर्धपुतळा बसवलेल्या व्यक्तिच्या ऐतिहासिक, सामाजिक कामगिरीबद्दल श्रीधर कुलकर्णी यांनी २३ जानेवारी रोजी माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज केला आहे. मात्र त्याला पालिकेकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.

‘हे काम शिवसेनेचे’

सध्या नेहरू रोड हा माझ्या विभागात असला तरी  या चौकाचे नामकरण झाले तेव्हा तेथे शिवसेनेच्या नगरसेविका होत्या. कोणत्याही चौकाला नाव देण्यासाठी पालिकेची प्रक्रिया असते. एकदा नाव दिल्यावर ते रद्द करण्याची सोय नाही, असे नगरसेविका ज्योति अळवणी यांनी सांगितले. श्रीमती लक्ष्मीबेन छाडवा या सामाजिक कार्यकर्त्यां होत्या, त्यांच्या नावाने नेत्र रुग्णालय आहे, त्यामुळे त्यांचे नाव या चौकाला देण्यात आले असे या विभागाच्या माजी नगरसेविका शुभदा पाटकर म्हणाल्या. तर ज्यांना आक्षेप आहेत, त्यांनी पालिकेकडून त्याची माहिती घ्यावी असे श्रीमती लक्ष्मीबेन छाडवा संस्थेचे विश्वस्त विनय नंदू यांनी सांगितले.

[jwplayer pqdTtL1f-1o30kmL6]