कचरा करण्याची सवय आणि अन्नपदार्थाच्या गाडय़ांवरून फेकला जाणारा कचरा यामुळे मुंबईत सर्वत्र उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. लाखोंच्या संख्येने असलेले उंदीर जमिनीचा पाया भुसभुशीत करत आहेत. पालिकेने वर्षभरात २ लाख ८० हजार उंदीर मारले असले तरी प्रत्यक्षात अधिक पटीने उंदीर अस्तित्वात आहेत.
मैदान, गोदाम, निवासी इमारती, कॉर्पोरेट कार्यालय ते अगदी मॉल आणि सिनेमागृहातही उंदीर आणि घुशी वाढल्याच्या तक्रारी येत आहेत. पालिकेच्या कीटकनाशक विभागाला विषारी औषध वापरण्यात अनेक अडचणी असतात, ते घातक असल्याने या विभागाकडून त्याचा सरसकट वापर केला जात नाही. मे ते जुलै या काळात निवडणुका व पावसाळा यामुळे उंदीर मारण्याची संख्या कमी झाली होती. मात्र त्यानंतरच्या पाच महिन्यांत सरासरी वीस हजार उंदीर मारले गेले. उंदीर, गुरे तसेच कुत्र्याच्या मलमूत्रातून लेप्टोस्पायरोसिसचे जंतू पसरतात. त्यामुळे पालिकेकडून उंदरांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. याशिवाय प्लेगच्या विषाणूंची चाचणीही केली जाते. मात्र उंदरांचा आजाराशी सध्या थेट संबंध लागत नसल्याने उंदीर मारण्याबाबतचे गांभीर्य कमी झाले आहे.
कचरा टाकण्याच्या मुंबईकरांच्या सवयीमुळे उंदीर वाढले आहेत. प्रजननक्षमता प्रचंड असल्याने उंदरांची संख्या एका वर्षांत दहापटीने तरी वाढते. त्यामुळे पालिकेने कितीही प्रयत्न केले तरी नागरिकांनी स्वच्छतेची सवय स्वीकारल्याशिवाय उंदरांपासून सुटका होणार नाही.
– राजन निरग्रेकर, कीटकनाशक विभागाचे अधिकारी