महापौरपदाची कारकीर्द संपुष्टात येतानाच आमदारकीचे स्वप्न पडलेल्या महापौर सुनील प्रभू यांनी यापूर्वीच घोषित झालेल्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाची बुधवारी पालिका मुख्यालयात नव्याने उजळणी केली. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महापौरांनी रस्त्यांसाठी ७,५०० कोटी रुपयांचे पॅकेजही जाहीर केले. निमित्त होते ते ‘मुंबई रोड्स मास्टर प्लान’ या पुस्तिकेच्या प्रकाशनाचे.
मुंबईतील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी महापालिकेने ‘मुंबई रोड्स मास्टर प्लान’ तयार केला असून या आराखडय़ानुसार येत्या तीन वर्षांमध्ये मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यात येणार आहेत. पालिका मुख्यालयात  प्रभू यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी या आराखडय़ाचे सादरीकरण केले. वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी पालिकेने आरे कॉलनीमधील जागा ताब्यात घेतल्यामुळे हा रस्ता मरोळपर्यंत पोहोचण्यातील अडसर दूर झाला आहे. पुढे उन्नतमार्गाद्वारे हा रस्ता पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडण्यात येणार आहे. हा रस्ता जात आरे कॉलनीमधून असून तेथील प्राण्यांचा वावर लक्षात घेऊन रस्त्याच्या दुतर्फा संरक्षक कुंपण घालण्यात येणार आहे.
पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या या प्रकल्पाची प्रभू यांनी पुन्हा एकदा घोषणा केली. गोरेगाव ते मुलुंड दरम्यानचा हा १६ कि.मी. लांबीचा रस्ता असून पवाई येथे जाण्यासाठी सात कि.मी. लांबीचा जोडरस्त्याचाही त्यात समावेश आहे. या रस्त्यावर एक हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून येत्या चार वर्षांमध्ये या रस्त्याचे काम पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले.