मुंबईमधील पालिका शाळांना लागून असलेल्या मैदानांवर कृत्रिम गवत विकसित करून दीर्घ सुट्टय़ांच्या काळात ही मैदाने खासगी संस्थांना सामने भरविण्यासाठी देण्याचा घाट पालिकेने घातला आहे. एकीकडे शाळांमधील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्याची भाषा करीत असलेली पालिका दुसरीकडे शाळांलगतची मैदाने खासगी संस्थांना त्यांचे सामने भरविण्यासाठी देण्याच्या विचारात आहे. तर मग सुट्टय़ांमध्ये आम्ही खेळाचा सराव करायचा कुठे, असा सवाल क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या पालिका शाळांतील विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

पालिकेच्या शाळा दत्तक विधानाने खासगी संस्थांना देण्याबाबतचे धोरण पालिकेने आखले होते. त्यावर समाजाच्या विविध स्तरातून टीकाही झाली. आता पालिका शाळांलगत असलेली मैदाने खासगी संस्थांना त्यांचे सामने भरविण्यासाठी खुली करून देण्याचा घाट पालिकेने घातला आहे.

पालिका शाळांलगतच्या काही मैदानांची दैना झाली असून दुरुस्ती करून ही मैदाने विद्यार्थ्यांना मैदानी खेळासाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. पालिकेने शारीरिक शिक्षणाच्या १७ विभागांमध्ये १७ क्रीडा केंद्रे सुरू करण्याची योजना आखली आहे. या योजनेचा एक भाग म्हणून पालिका शाळांना लागून असलेल्या मैदानांचा विकास करण्यात येणार आहे.  पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खोखे आदींचे प्रशिक्षण देण्यासाठी आणि सराव करता यावा यासाठी शाळांलगतच्या मैदानांवर कृत्रिम गवताची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या क्रीडाविषयक गुणांना वाव मिळेल, असे पालिकेचे म्हणणे आहे.

विकसित केलेली शाळांलगतची मैदाने सुट्टय़ांच्या काळात खासगी संस्थांना देण्याचा विचार करण्यात येत आहे. मग क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो आदी क्रीडाप्रकारांमध्ये

प्रावीण्य दाखविणाऱ्या पालिका शाळांमधील विद्यार्थी सराव कुठे करणार असा सवाल पालिका वर्तुळात उपस्थित करण्यात आला आहे.

महसुलात भर पडणार?

  • पालिका शाळांमधील सभागृह आणि पटांगण खासगी संस्थांना देण्याबाबत शिक्षण विभागाने धोरण आखले आहे. त्याच धर्तीवर आता पालिका शाळांना लागून असलेल्या मैदानांमध्ये क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो या क्रीडाप्रकारांसाठी कृत्रिम गवताची व्यवस्था करण्यात येणार आहे.
  • पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना आपले क्रीडा कौशल्य दाखविता यावे यासाठी या मैदानांमध्ये कृत्रिम गवताची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र वस्तुस्थिती निराळीच आहे.
  • शाळांना पडणाऱ्या दीर्घ रजांमध्ये ही मैदाने खासगी संस्थांना त्यांचे सामने आयोजित करण्यासाठी देण्याचा विचार अधिकारी करीत आहेत. खासगी संस्थांकडून शुल्क आकारून त्यांना ही मैदाने भाडय़ाने देण्यात येणार असून त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत महसुलाची भर पडू शकेल, असा दावा या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.