मोडकसागर धरणातून अतिरिक्त दाबाने पाणी शहरात आणण्यासाठी महानगरपालिकेने आखलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील, सरोस्पर्शाचा (लेक टॅपिंग) अखेरचा टप्पा बुधवारी, ३ सप्टेंबरला पार पडणार आहे. या सुरुंग स्फोटानंतर धरणातील सर्वात खालच्या पातळीवरील बोगदा खुला होणार आहे. कोयना धरणानंतर प्रथमच अशा प्रकारे लेक टॅपिंग केले जाणार आहे.
मोडकसागर हे धरण वैतरणा नदीच्या सर्वात खालच्या बाजूला बांधण्यात आले आहे. त्यापेक्षा अधिक उंचीवर मध्य वैतरणा व अप्पर वैतरणा ही दोन धरणे आहेत. या दोन्ही धरणातील पाणी मोडकसागरमध्ये आणले जाते. धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्यावरही या बोगद्यातून पाणीपुरवठा होऊ शकेल.
त्याचप्रमाणे तांत्रिकदृष्टय़ा धरणातील खालच्या पातळीवरील पाणी वाहते राहणे आवश्यक असते. धरणातील पाणी कमी करून इतर दोन बोगदे करण्यात आले असले तरी खालच्या पातळीवरील बोगद्यासाठी मात्र सुरुंगस्फोट आवश्यक आहे, असे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांनी सांगितले. प्रस्तावित गारगाई धरणातील पाणीही मोडकसागरमध्ये आणले जाणार आहे.
पाणी अधिक वेगाने व दाबाने शहरात आणण्यासाठी पालिकेने ‘मोडक सागर बोगदा प्रकल्प’ हाती घेतला. येथे प्रत्येक बाजू सात मीटर व खोली १०४ मीटर असलेली षटकोनी विहीर बांधली आहे. पाण्याचा भोवरा टाळण्यासाठी विहीरीचा आकार षटकोनी ठेवलेला आहे. या आदान विहीरीपासून बेलनालापर्यंत ४.१ मीटर व्यासाचा आणि ६७७३ मीटर लांबीचा मुख्य बोगदा बांधून पूर्ण झाला आहे. तसेच या विहिरीला धरणाशी तीन उपबोगद्यांनी जोडले आहे. हे बोगदे अनुक्रमे १५६ मीटर, १४६ मीटर व १३६ मीटर उंचीवर आहेत. मोडकसागर धरणातील पाण्याची पातळी कमी करून १५६ मीटर व १४६ मीटर उंचीवरील बोगदे यापूर्वीच धरणाशी जोडण्यात आले असून २८ मार्च २०१४ रोजी कार्यान्वितही करण्यात आले. १३६ मीटर उंचीवरील बोगदा जोडण्यासाठी मात्र सुरुंगस्फोटाची गरज आहे. याआधी कोयना धरणावर दोनदा लेक टॅपिंगचा (सरोस्पर्श) करण्यात आले. कोयनाात राज्याच्या जलप्रकल्प विभागाचे प्रमुख अभियंता दीपक मोडक; तसेच जलविद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता रजनीश शुक्ला हे या वेळी उपस्थित राहतील.