हॉटेलमालकांकडून वाहनतळ शुल्क वसूल करण्याचा पालिकेचा विचार

जेवायला आलेल्या ग्राहकांची वाहने बिनदिक्कत हॉटेलसमोरील रस्त्यावर उभी करू देणाऱ्या हॉटेलमालकांना वेसण घालण्याचा विचार मुंबई महापालिकेने चालवला आहे. याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेऊन अशा वाहनांच्या पार्किंगची हॉटेलमालकाकडून शुल्क वसुली करण्यात येईल. त्यामुळे हा भरुदड हॉटेलमालक स्वत: पेलतात की ग्राहकांवर लादतात, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईतील वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. तसेच आसपासच्या शहरांतून कामानिमित्त अनेक मंडळी आपली वाहने घेऊन मुंबईत येत असतात. त्यामुळे वाहने उभी करण्याची समस्या पालिकेसाठी डोकेदुखी बनली आहे.

आपल्या हॉटेलमध्ये ग्राहकांनी यावे यासाठी हॉटेलमालकांनी नामी युक्ती शोधून काढली आहे. हॉटेलबाहेर रस्त्यावर वाहने उभी करण्याची सुविधा हॉटेलमालकांकडून ग्राहकांना देण्यात येत आहे. हॉटेलमालकाने नियुक्त केलेली व्यक्ती ग्राहकांच्या वाहनांवर लक्ष ठेवण्याचे काम करते. हॉटेलमध्ये न जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीने तेथे आपले वाहन उभे केलेच तर ती व्यक्ती त्याला हटकते आणि तेथे वाहन उभे करण्यास मनाई करते. इतकेच नव्हे तर हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या या वाहनांकडे वाहतूक पोलीसही कानाडोळा करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

हॉटेलमालक ग्राहकांची वाहने उभी करण्यासाठी हॉटेलबाहेरील रस्त्याचा फुकटात वापर करीत असल्याने पालिकेचा महसूल बुडत आहे. त्यामुळे भविष्यात हॉटेलबाहेरील रस्त्याचा वाहनतळ म्हणून उपयोग करणाऱ्या हॉटेलमालकांकडून वाहनतळ शुल्क वसूल करण्याचा विचार पालिका प्रशासन करीत आहे. हॉटेलमालकांनी हॉटेलबाहेरील रस्त्यासाठी वाहनतळ शुल्क भरले तर ते सर्वसामान्य नागरिकांना तेथे वाहने उभी करू देणार नाहीत. त्यामुळे यावर तोडगा कसा काढायचा याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू आहे. हॉटेलबाहेरच्या रस्त्यावर ग्राहकांसोबत सर्वसामान्य नागरिकांनाही आपली वाहने उभी करण्याची मुभा मिळायला हवी, असे काही अधिकाऱ्यांचे मत आहे. दोन-चार दिवसांमध्ये त्यावर तोडगा काढण्यात येणार असून लवकरच धोरणात्मक निर्णय घेऊन हॉटेलबाहेरील रस्त्यावर ग्राहकांची वाहने उभी करणाऱ्या हॉटेलमालकांकडून वाहनतळ शुल्क वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात हॉटेलमालकांना हॉटेलबाहेरील रस्त्याचा विनाशुल्क वापर करता येणार नाही.

रस्त्यांवरील वाहनतळे ही सार्वजनिक वाहनतळे आहेत. ती सर्वसामान्य वाहनमालकांसाठी खुली असायला हवीत. हॉटेलबाहेरील रस्त्यांचा वापर हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची वाहने उभी करण्यासाठी होत असेल तर तेथे सर्वसामान्यांनाही आपली वाहने उभी करण्याची मुभा असायला हवी. याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. ग्राहकांची वाहने उभी करण्यासाठी रस्त्याचा वापर करणाऱ्या हॉटेलमालकांना वाहनतळ शुल्क भरावे लागेल.

– अजोय मेहता, पालिका आयुक्त