पावसामुळे खड्डे भरता आले नाहीत, असे निवेदन मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांनी स्थायी समितीत दिले आहे. गेल्या चार दिवसांमध्ये अनेक खड्डे भरल्याची माहिती मेहतांनी दिली आहे. शिवाय मुंबईत फक्त ३५ खड्डे असल्याची रेकॉर्डवरील माहिती चुकीची असल्याची कबुलीदेखील मेहतांनी दिली आहे.

‘गेल्या वर्षी ७५ दिवस पाऊस झाला होता. यंदा मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त दिवस आणि जोरदार पाऊस झाल्याने खड्डे भरता आले नाहीत’, अशी सारवासारव अजॉय मेहता यांनी स्थायी समितीत केली. निकृष्ट बांधकामांमुळे मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्यांवरील खड्डे वेळेवर बुजवले न गेल्याने त्याचा फटका सामान्य मुंबईकरांना बसतो आहे. मात्र आता या सगळ्याचे खापर मेहता यांनी पावसावर फोडले आहे.

मुंबईतील रस्त्यांवर केवळ ३५ खड्डे पडल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून ऑक्टोबरच्या सुरुवातीला करण्यात आला होता. स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आलेल्या या अजब दाव्यामुळे नगरसेवक संतप्त झाले होते. मात्र पालिका प्रशासनाची ही माहिती चुकीची असल्याची कबुली खुद्द पालिका आयुक्त अजॉय मेहतांनी दिली आहे. ‘मुंबईतील रस्त्यांवर फक्त ३५ खड्डे आहेत, ही पालिकेच्या रेकॉर्डवरील माहिती चुकीची आहे’, असे मेहतांनी म्हटले आहे.

सोमवार (१७ ऑक्टोबरपर्यंत) मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते मिळतील, असे पालिका आयुक्तांनी म्हटले होते. यासाठी शनिवारी आयुक्तांनी ४८ तासांची मुदत देण्यात आली होती. मात्र आयुक्तांचा हा दावा फोल ठरला. आयुक्तांची ४८ तासांची मुदत उलटून आणखी ४८ तास होऊन गेल्यानंतरही रस्त्यावरील खड्डे जैसे थे आहेत. मात्र तरीही या कालावधीत बरेचसे खड्डे बुजवल्याचा दावा पालिका आयुक्तांनी केला आहे.