कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला सनातन संस्थेचा सदस्य समीर गायकवाड याच्यावर सध्या चालवण्यात येणाऱ्या खटल्याला दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत कायम ठेवली आहे. कोल्हापूर विशेष न्यायालयासमोर सध्या समीरवर खटला चालवण्यात येत असून त्याच्यावरील आरोपनिश्चिती पुन्हा लांबली आहे.

पानसरे यांच्यासह अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर व साहित्यिक एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येमध्ये साम्य असून त्यांचे हल्लेखोर एकच असल्याचा पोलिसांचा दावा आहे. या तिघांच्या शरीरांतून मिळालेल्या गोळ्या कालिना तसेच बंगळुरू येथील न्याय्यवैद्यक प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवण्यात आल्या होत्या. परंतु दोन्ही न्यायवैद्यक प्रयोगशाळांनी परस्परविरोधी अहवाल दिलेला आहे. त्यामुळे दुसरे मत घेण्यासाठी या गोळ्या ‘स्कॉटलंड यार्ड’च्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांचा अहवाल येईपर्यंत समीरवर आरोप निश्चित केले जाऊ नयेत आणि खटल्याला स्थगिती द्यावी, अशी मागणी सरकारतर्फे करण्यात आली होती.

न्यायमूर्ती साधना जाधव यांच्यासमोर सरकारच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. त्या वेळेस स्कॉटलंड यार्डच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून अद्याप अहवाल आला नसल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. तसेच स्थगिती कायम ठेवण्याची विनंती करण्यात आली. ती न्यायालयाने मान्य केली.