केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी मंगळवारी संसदेत मोदी सरकारचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये मुंबईच्या वाट्याला उपनगरीय रेल्वेच्या डब्यांना स्वयंचलित दरवाजे बसविणे आणि मुंबई-अहमदाबाद पहिली ‘बुलेट ट्रेन’ या दोनच महत्त्वाच्या गोष्टी आल्या.
परळला टर्मिनस उभारणे, चर्चगेट-विरार उन्नत मार्ग, पनवेल-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस उन्नत मार्ग, कल्याण-कर्जत मार्गाचे चौपदरीकरण अशा अनेक प्रकल्पांचे गाजर मुंबईकरांना याआधी यूपीए सरकारच्या काळात दाखवण्यात आले होते. मात्र, याबाबतची कोणतीही दखल रेल्वे अर्थसंकल्पात घेण्यात आलेली नाही. 
देशातील पहिली ‘बुलेट ट्रेन’ मुंबई ते अहमदाबाद मार्गावर सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या प्रस्तावित प्रकल्पासाठी रेल्वे अर्थसंकल्पात केवळ १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
त्याचबरोबर उपनगरीय रेल्वे डब्यांना स्वयंचलित दरवाजे बसविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यावर्षी पूर्ण होणाऱया रेल्वेप्रकल्पांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे गौडा यांनी सांगितले.
मुंबईत येत्या दोन वर्षात ८६४ नवे लोकल डबे आणणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली. तसेच महत्त्वाची रेल्वे स्थानके आंतरराष्ट्रीय विमानतळांसारखी अद्ययावत करण्यावर भर देणार असल्याचंही ते म्हणाले.
मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवर स्वयंचलित जिने बसविण्याचे रेल्वेसंकल्पात नमूद करण्यात आले आहे आणि स्थानकांवर स्वच्छता राखण्यासाठी खास योजना राबविण्यात येणार आहे. सुवर्ण चतुष्कोन या अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळातील योजनेप्रमाणे देशातील महत्त्वाची शहरे जोडणारी योजना रेल्वे सुरू करणार असल्याचेही रेल्वे मंत्र्यांनी सांगितले.
गोवा-मुंबई, नागपूर-सिकंदराबाद मार्गावर हायस्पीड ट्रेन सुरू करण्यात येणार आहे तर, मुंबईहून इतर महत्वाच्या शहरांना जोडणाऱया नव्या गाड्यांचीही घोषणा करण्यात आली.

मुंबईहून सुटणाऱया नव्या गाड्या

* मुंबई-पतियाळा एक्स्प्रेस
* वांद्रे- जयपूर एक्स्प्रेस
* मुंबई सेंट्रेल- नवी दिल्ली नव्या गाड्यांची योजना
* मुंबई-गोरखपूर जनसाधारण एक्स्प्रेस (आठवड्यातून एकदा )
* मुंबई-जयनगर जनसाधारण एक्स्प्रेस (आठवड्यातून एकदा )
* कुर्ला-आझमगड एक्स्प्रेस (आठवड्यातून एकदा )
* मुंबई-काझीपेठ एक्स्प्रेस (बल्लारशाह मार्गे) (आठवड्यातून एकदा )
* मुंबई-पालीताना एक्स्प्रेस (आठवड्यातून एकदा )
* कुर्ला-लखनौ एसी एक्स्प्रेस (आठवड्यातून एकदा )

महाराष्ट्रात औरंगाबाद- चाळीसगाव, सोलापूर- तुळजापूर या मार्गाचे सर्वेक्षण होणार आहे. पुणे-निजामुद्दीन दर आठवड्याला धावणारी एक्स्प्रेसही जाहीर करण्यात आली आहे. तर, नागपूर-बिलासपूर मार्गावर जलद गाड्यांचे जाळे उभारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. कसारा-इगतपूरी दरम्यान चौथ्या मार्गाचे काम सुरू केले जाणार आहे. चंद्रपूर-नागभीड रेल्वे मार्गाचा विस्तार करण्यात येणार आहे.