‘कर्करोग योद्धे’ उपक्रमातील डॉक्टरांकडून ठाणे जिल्हा रुग्णालयात पहिली शस्त्रक्रिया

ठाणे जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्ष. टाटा कर्करुग्णालयाच्या ‘कर्करोग योयोद्धे’ उपक्रमातील डॉक्टर या रुग्णालयात पहिलीच कर्करोग शस्त्रक्रिया करीत होते. एका चाळिशीच्या महिलेवर स्तनाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया सुरू होती आणि कक्षाबाहेर उभे असलेल्या डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर तणाव व कुतूहल दिसत होते. रुग्णालयाचे प्रमुख व ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. भाऊसाहेब केंपी-पाटील हेही मदत करत होते. तासाभरात शस्त्रक्रिया पार पडली आणि डॉक्टरांसह सर्वानी समाधानाचा सुस्कारा सोडला. जिल्हा रुग्णालयात ‘कर्करोग योद्धे’ उपक्रमातील डॉक्टरांनी केलेली पहिलीच शस्त्रक्रिया यशस्वी झाली. सामाजिक जाणिवेतून आणखी गरजू रुग्णांवर अशा शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे डॉ. भाऊसाहेब केंपी-पाटील यांनी स्पष्ट केले.

कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन टाटा कर्क रुग्णालयाने ‘महाराष्ट्र कर्करोग योद्धे’ (कॅन्सर वॉरियर्स) हा उपक्रम आरोग्य विभागाच्या सहकार्याने राज्यातील जिल्हा रुग्णालयांमध्ये राबविण्यास सुरुवात केली आहे. जूनपासून राज्यातील काही जिल्हा रुग्णालयांमध्ये या शस्त्रक्रिया पार पडल्या असल्या तरी ठाणे जिल्हा रुग्णालयात प्रथमच ही शस्त्रक्रिया करण्यात आली. जिल्हा रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांची लक्षणे पाहून तसेच आवश्यक त्या चाचण्या सुरू करण्यात आल्या होत्या. ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील कंपनीत काम करणाऱ्या चाळिशीच्या महिलेला स्तनांचा कर्करोग असल्याचे आढळून आले. आर्थिक परिस्थिती नाही आणि शस्त्रक्रिया तातडीने करणे आवश्यक होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भाऊसाहेब केंपी- पाटील यांनी तातडीने ‘कर्करोग योद्धे’ उपक्रमातील डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यानंतर डॉ. नीलेश चोरडिया यांनी या महिलेची तपासणी करून बुधवारी सकाळी शस्त्रक्रियाही केली. या डॉक्टरांच्या मदतीने ठाणे जिल्हा रुग्णालयात झालेली पहिलीच शस्त्रक्रिया असून वेळीच कर्करोगाचे निदान झाल्यास कर्करोग आटोक्यातच नव्हे तर बराही होऊ शकतो हे लक्षात घेऊन सामाजिक संघटनांच्या मदतीने क र्करोग तपासणी मोहीमही हाती घेण्यात येणार असल्याचे डॉ. केंपी- पाटील यांनी सांगितले. डॉ. प्रशांत पवार व डॉ. चोरडिया हे दोन कर्करोगतज्ज्ञ आमच्याकडे उपलब्ध असून त्यांच्या मदतीने जिल्हा स्तरावर कर्करोगाशी लढाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. परळच्या टाटा कर्क रुग्णालयाचे संचालक डॉ. राजन बडवे आणि प्राध्यापक डॉ. पंकज चतुर्वेदी यांच्या संकल्पनेतून ‘कर्करोग योद्धे’ हा उपक्रम आकारास आला. तेथे शिकलेल्या व राज्याच्या वेगवेगळ्या भागात खासगी व्यवसाय करणाऱ्या कर्करोगतज्ज्ञांना एका व्यासपीठावर आणून कर्करुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया करण्याचा हा उपक्रम आहे. तब्बल ५७ कर्करोगतज्ज्ञ या उपक्रमात सहभागी झाले आहेत.

जास्तीत जास्त कर्करुग्णांना मदतीचा हात

ठाणे जिल्हा रुग्णालयात गेल्या पाच महिन्यात ७८,६०५ रुग्णांना बाह्यरुग्ण विभागात उपचार करण्यात आले, तर १०,२३१ रुग्णांना दाखल करण्यात आले. रुग्णालयात गेल्या पाच महिन्यात २८०० शस्त्रक्रिया करण्यात आल्या, तर १५०८ बाळंतपणे करण्यात आली. मात्र, कर्करुग्णावर प्रथमच शस्त्रक्रिया करण्यात आली असून आगामी काळात लवकर निदानासाठी पाठपुरावा करून जास्तीत जास्त कर्करुग्णांना मदत करण्याचा संकल्प डॉ. केंपी- पाटील यांनी केला आहे.