तिकीटे घरी आल्यावर त्याचे पैसे द्या, या नव्या पद्धतीनेही आता रेल्वेची तिकीटे आगाऊ आरक्षित करता येणार आहेत. या नव्या पद्धतीला भारतीय रेल्वेने सुरुवात केली असून, देशातील २०० शहरांमध्ये ही सुविधा सुरुवातीला उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या वस्तू इंटरनेटच्या माध्यमातून खरेदी करून त्या घरी पोहोचल्यावर त्याचे पैसे देण्याची पद्धत रूढ होती. मात्र, रेल्वेची तिकीटे अशा पद्धतीने उपलब्ध होण्याची ही नवी सुरुवात आहे.
आयआरसीटीसीने ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ पद्धतीने रेल्वेची तिकीटे उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. ज्यांच्याकडे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड नाही, त्याचबरोबर जे प्रवाशी इंटरनेटच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार करायला तयार नसतात, त्यांच्यासाठी ही सुविधा विशेष उपयुक्त ठरणार आहे. या नव्या पद्धतीमध्ये प्रवाशांना इंटरनेटच्या माध्यमातूनच आपले तिकीट आरक्षित करावे लागेल. तिकीट आरक्षित झाल्यावर त्याची प्रत संबंधित प्रवाशाला घरपोच केली जाईल. त्यावेळी तिकीटाचे पैसे प्रवाशाला द्यावे लागणार आहेत.